(रत्नागिरी /प्रतिनिधी)
शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळच रस्त्याची अक्षरशः वाट लावण्यात आली आहे. प्रवेशद्वारालगत सरळ रेषेत खोदाई करून त्यावर योग्य पद्धतीने भराव न केल्याने खडी माती वर आली असून, मोठ्या प्रमाणात खडी रस्त्यावर पसरली आहे. त्यामुळे रुग्णालयात ये-जा करणाऱ्या रुग्णांसह नातेवाइकांना आणि वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
रस्त्याची ही खोदाई नेमकी नगर परिषदेमार्फत करण्यात आली की एखाद्या केबल कंपनीने केली, याबाबतच संभ्रम निर्माण झाला आहे. खोदाई कोणी केली, याची माहिती संबंधित यंत्रणांना आहे की नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. सार्वजनिक रस्ता खोदल्यानंतर तो पूर्ववत करण्याची जबाबदारी कोणाची, याचे उत्तरही प्रशासनाने द्यावे, अशी मागणी होत आहे. एकीकडे पावसाळ्यात रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे करताना अनेक अडचणी येतात, हे प्रशासनाला माहीत असताना रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळच खोदाई करण्यात आली. मात्र खोदाईनंतर चर व्यवस्थित बुजवून रस्ता पूर्ववत करण्याऐवजी माती आणि खडीचा पसारा तसाच सोडून देण्यात आल्याने संबंधित यंत्रणेच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी दररोज मोठ्या संख्येने नागरिकांची वर्दळ असते. अशा ठिकाणी रस्त्यावर खडी पसरलेली असणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देण्यासारखे आहे. दुचाकीस्वारांचे वाहन घसरण्याची शक्यता असून, पायी ये-जा करणाऱ्या रुग्ण आणि वृद्ध नागरिकांनाही याचा फटका बसू शकतो. शहरातील सार्वजनिक रस्ता खोदताना संबंधित विभागाची परवानगी, सुरक्षिततेच्या उपाययोजना आणि खोदाईनंतर रस्ता पूर्ववत करण्याची जबाबदारी निश्चित असणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात खोदाई करा, खडी पसरवा आणि नागरिकांनी त्रास सहन करावा, अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, रस्त्यावर पसरलेली खडी तातडीने हटवून खोदलेला चर समांतर योग्य पद्धतीने भरावा आणि रस्ता पूर्ववत करावा, अशी मागणी जोर धरत आहे. जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच नागरिकांच्या गैरसोयीचा हा ‘चर’ प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आहे. आता संबंधित यंत्रणा हा चर बुजवून रस्ता पूर्ववत करते की नेहमीप्रमाणे केवळ पाहणी आणि आश्वासनांपुरतीच कारवाई राहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

