( मुंबई )
राज्यातील इयत्ता 11 वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी शैक्षणिक वर्ष 2026-27 चे नियमित CAP फेरी-1 वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय यांनी ही माहिती दिली असून विद्यार्थ्यांना आता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी प्रवेश अर्जाचा भाग-1 आणि भाग-2 भरण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत तब्बल 7 लाख 74 हजार 918 विद्यार्थ्यांनी नोंदणी पूर्ण केली आहे. विद्यार्थ्यांनी mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रियेचे महत्त्वाचे वेळापत्रक
- 8 ते 20 मे : नोंदणी आणि अर्जाचा भाग-1 भरणे
- 21 आणि 22 मे : नवीन नोंदणी, अर्ज दुरुस्ती आणि भाग-2 भरणे
- 23 ते 26 मे : CAP फेरी-1 अलॉटमेंट प्रक्रिया
- 26 मे : पहिली प्रवेश वाटप यादी जाहीर
- 26 ते 28 मे : प्रवेश निश्चिती, कागदपत्र पडताळणी आणि शुल्क भरणे
- 29 मे : रिक्त जागांची माहिती जाहीर
- 30 मे : CAP फेरी-2 चे वेळापत्रक जाहीर
विद्यार्थ्यांना मिळणार 10 कॉलेज पसंतीक्रमाची सुविधा
विद्यार्थ्यांना किमान एक आणि कमाल दहा कनिष्ठ महाविद्यालयांचा पसंतीक्रम देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवेश वाटपाची माहिती विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनवर उपलब्ध होणार असून एसएमएसद्वारेही कळवण्यात येणार आहे.
राज्यभर ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया
गतवर्षीपासून संपूर्ण राज्यात अकरावी प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवली जात आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यात अडचण येऊ नये यासाठी 10 एप्रिलपासून अर्जाचा भाग-1 भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या वर्षी तीन नियमित फेऱ्या, ‘ओपन टू ऑल’ चौथी फेरी आणि मुलींसाठी विशेष पाचवी फेरी आयोजित करण्यात येणार आहे.
मदत आणि हेल्पलाईन
प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी विद्यार्थी support@mahafyjcadmissions.in या ई-मेलवर संपर्क साधू शकतात. तसेच 8530955564 हा हेल्पलाईन क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

