मंगळागौर हे हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे व्रत असून महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत त्याला विशेष स्थान आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलांनी लग्नानंतरची पहिली पाच वर्षे हे व्रत करण्याची परंपरा आहे. पती-पत्नीमधील प्रेम, निष्ठा आणि सुखी संसाराचे प्रतीक म्हणून भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. त्यांचा आशीर्वाद आणि कृपादृष्टी लाभावी, या श्रद्धेने मंगळागौरीचे व्रत केले जाते. सौभाग्य, वैवाहिक सुख आणि कुटुंबाच्या मंगलासाठी ही परंपरा पाळली जाते.
मंगळागौरीच्या पूजेत गौरीसोबत भगवान शिव आणि गणपतीचीही पूजा केली जाते. महिलांकडून देवीला फुले, हळद-कुंकू, अक्षता, नैवेद्य आदी अर्पण करून आरती केली जाते. धार्मिक श्रद्धेनुसार वैवाहिक जीवन सुखी राहावे, पतीला दीर्घायुष्य लाभावे आणि कुटुंबात सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना या वेळी केली जाते.
मंगळागौर पूजेत सोळा प्रकारची पत्री आणि विविध फुले अर्पण करण्याची परंपरा आहे. पूजेदरम्यान अर्जुनसादडा, आघाडा, कण्हेर, चमेली, जाई, डाळिंब, डोरली, तुळस, दुर्वा, धोत्रा, बेल, बोर, माका, मोगरा, रुई, विष्णुक्रांता, शमी आणि शेवंती आदी वनस्पतींचा समावेश केला जातो. या परंपरेमागे विविध औषधी आणि उपयुक्त वनस्पतींची ओळख व्हावी, हादेखील उद्देश असल्याचे मानले जाते.
मंगळागौर पूजेसाठी अन्नपूर्णा देवीची मूर्ती, अक्षता, हळद-कुंकू, पाच खारका, नित्यपूजेचे साहित्य, बुक्का, पाच बदाम, पाच सुपाऱ्या, चार खोबऱ्याच्या वाट्या, सोळा प्रकारची पत्री, दोन वस्त्रे, आठ वाती, कापूर, गुलाल, बेलपत्र, फुले, दुर्वा, सोळा काडवाती, तुळशीची पाने, केळी, पंचामृत, नैवेद्यासाठी दूध, जानवे, सोळा विड्याची पाने, गणपतीसाठी सुपारी, अत्तर, केवड्याचे कणीस, एक नारळ, कापड आणि इतर पूजासाहित्याची आवश्यकता असते.
यंदा 2 सप्टेंबर 2026 रोजी मंगळागौर पूजा आहे. पूजा करण्यासाठी सर्वप्रथम चौरंगाभोवती रांगोळी काढून चारही कोपऱ्यांवर केळीचे खुंट बांधले जातात. त्यावर लाल रंगाचे वस्त्र घातले जाते. चौरंगाच्या मध्यभागी मंगळागौरी अर्थात अन्नपूर्णा देवीची मूर्ती आणि बाजूला भगवान महादेवांची पिंड ठेवली जाते. त्यानंतर सुपारीच्या स्वरूपात श्रीगणेशाची स्थापना करून गणपती आणि कलशाचे पूजन केले जाते. देवीला हळद, कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण केली जातात. सोळा प्रकारची पत्री आणि विविध फुले वाहून पूजा केली जाते. सोळा पुरणाचे दिवे प्रज्वलित करून देवीला ओवाळले जाते. त्यानंतर नैवेद्य अर्पण करून आरती म्हटली जाते. तसेच हळद-कुंकू आणि वाण देण्याची परंपरा आहे.
मंगळागौरीच्या जागरणाला या उत्सवात विशेष महत्त्व आहे. पूजा झाल्यानंतर महिला एकत्र येऊन रात्री जागरण करतात. या वेळी विविध पारंपरिक खेळ खेळले जातात आणि मंगळागौरीची गाणी म्हटली जातात. ‘लाट्या बाई लाट्या’, ‘सारंगी लाट्या’, ‘अठूडं केलं, गठूडं केलं’ यांसारख्या गाण्यांमुळे जागरणाचा उत्साह अधिक वाढतो. नऊवारी साडी, नाकात नथ आणि पारंपरिक दागिने परिधान करून महिला हा उत्सव साजरा करतात.
मंगळागौरीच्या जागरणात वटवाघूळ फुगडी, बस फुगडी, तवा फुगडी, फिंगरी फुगडी, वाकडी फुगडी, आगोटा-पागोटा, साळुंकी, गाठोडे, लाटा बाई लाटा, घोडा हाट, करवंटी झिम्मा, टिपऱ्या, गोफ, सासू-सून भांडण, अडवळ घुम-पडवळ घुम, सवतीचे भांडण, दिंड आणि घोडा असे अनेक खेळ खेळले जातात. मंगळागौरीच्या जागरणात साधारणपणे 110 प्रकारचे खेळ खेळले जातात. त्यामध्ये सुमारे 21 प्रकारच्या फुगड्या आणि आगोटा-पागोट्याचे सहा प्रकार समाविष्ट आहेत.
या पारंपरिक खेळांमुळे शरीराच्या विविध अवयवांना हालचाल मिळते आणि त्यातून व्यायामही होतो. पूर्वीच्या काळात घरातील कामांमध्ये व्यस्त असलेल्या महिलांसाठी हे खेळ आनंद, मनोरंजन आणि एकत्र येण्याचे महत्त्वाचे माध्यम होते. मंगळागौरीच्या निमित्ताने माहेरच्या आणि सासरच्या महिला, मैत्रिणी तसेच नातेवाईक एकत्र येतात. गाणी, खेळ, उखाणे आणि जागरणाच्या माध्यमातून महिलांमध्ये संवाद, मैत्री आणि एकोपा वाढतो. जुन्या पिढीकडून नवीन पिढीकडे पारंपरिक खेळ, गाणी आणि लोकपरंपरा पोहोचवण्याचे महत्त्वाचे माध्यम म्हणूनही मंगळागौरीकडे पाहिले जाते.
काही महाराष्ट्रीय कुटुंबांमध्ये लग्नानंतरची पहिली मंगळागौर माहेरी करण्याची परंपरा आहे. त्यानंतर काही वर्षे हे व्रत सुरू ठेवले जाते. प्रचलित परंपरेनुसार पाच किंवा सात वर्षांनंतर मंगळागौरीचे उद्यापन केले जाते. मात्र ही पद्धत कुटुंबाच्या आणि कुळाचाराच्या परंपरेनुसार बदलू शकते. त्यामुळे मंगळागौर हा केवळ धार्मिक विधी न राहता श्रद्धा, परंपरा, महिला सहभाग, आनंद आणि महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा सुंदर संगम ठरतो.

