(लांजा/ प्रतिनिधी)
मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी पूल परिसरातील अवघड वळणावर कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून कंटेनर दुभाजकावर आदळून पलटी झाला. शनिवारी (२९ ऑगस्ट) सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने या दुर्घटनेत चालकाला किरकोळ दुखापत झाली असून मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर क्रमांक GA 05 T 6374 हा गुजरातहून गोव्याच्या दिशेने जात होता. अंजणारी पुलाजवळील अवघड वळणावर कंटेनरचे अचानक ब्रेक फेल झाले. त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कंटेनर रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन आदळला. त्यानंतर कंटेनर उजव्या कुशीवर पलटी झाला. या अपघातात M. D. अन्वर खान (वय ५२, रा. कोलकाता) हे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करण्यात आली. जखमी चालकाला महादेव सांबरे ट्रस्टच्या रुग्णवाहिकेतून लांजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.
अपघातामुळे कंटेनरचे किरकोळ नुकसान झाले आहे. घटनास्थळी वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी बॅरिकेडिंग करण्यात आले. तसेच क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त कंटेनर रस्त्याच्या बाजूला हटविण्यात आला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यात आली. अवघड वळणावर ब्रेक निकामी झाल्याने काही क्षणांतच चालकाचा ताबा सुटला. मात्र कंटेनर दुभाजकावर आदळून पलटी होऊनही चालकाला केवळ किरकोळ दुखापत झाल्याने मोठा अनर्थ टळला.

