(मुंबई / वृत्तसंस्था)
प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्याच बॉयफ्रेंडने कोल्डड्रिंकमध्ये विषारी डांबर गोळ्या मिसळून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना चेंबूर परिसरात समोर आली आहे. विष्णुमाया असे मृत तरुणीचे नाव असून, या प्रकरणी आरसीएफ पोलिसांनी तिचा बॉयफ्रेंड आशिष मगर याला अटक केली आहे. हत्येनंतर विष्णुमायाचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे भासवून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आरोपीने केला. मात्र, डॉक्टरांच्या निरीक्षणामुळे आणि पोलिसांच्या तपासामुळे या प्रकरणाचा उलगडा झाला. न्यायालयाने आरोपी आशिष मगर याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नेमका प्रकार काय घडला?
मिळालेल्या माहितीनुसार, आशिष मगर याला त्याची प्रेयसी विष्णुमायाच्या चारित्र्यावर संशय होता. याच कारणावरून दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते. घटनेच्या दिवशी आशिषने विष्णुमायाला कोल्डड्रिंक पिण्यासाठी दिले. मात्र, या कोल्डड्रिंकमध्ये त्याने विषारी डांबर गोळ्या मिसळल्या होत्या. हे पेय प्यायल्यानंतर विष्णुमायाला तीव्र मळमळ होऊ लागली. त्यानंतर तिला उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला.
फूड पॉयझनिंगचा बनाव, डॉक्टरांना संशय
विष्णुमायाची तब्येत बिघडल्यानंतर तिच्या आईने तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सुरुवातीला हा प्रकार फूड पॉयझनिंगमुळे झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र, उपचारादरम्यान विष्णुमायाला काळ्या रंगाच्या उलट्या झाल्या. ही बाब डॉक्टरांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. काळ्या रंगाच्या उलट्यांमुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा हत्येच्या दिशेने तपास सुरू केला. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीमुळे आरोपीने मृत्यू नैसर्गिक असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केल्याचा संशय अधिक बळावला.
व्हॉट्सॲप चॅटमुळे तपासाला मिळाली दिशा
तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी विष्णुमायाचा मोबाईल फोन ताब्यात घेतला. मोबाईलमधील व्हॉट्सॲप चॅट तपासले असता तिचे बॉयफ्रेंड आशिष मगरसोबत जोरदार भांडण झाल्याचे चॅट पोलिसांच्या हाती लागले. या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी आशिषला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान आशिषने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. कोल्डड्रिंकमध्ये मिसळलेल्या डांबर गोळ्यांमुळे विष्णुमायाच्या शरीरात विष पसरले. रुग्णालयात उपचार सुरू असताना तिची प्राणज्योत मालवली.
या प्रकरणी पोलिसांनी परिस्थितीजन्य पुरावे आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आशिष मगर याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, आरसीएफ पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

