(रत्नागिरी / वार्ताहर)
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या वतीने ‘Rotary Rain Run – Say No to Drugs’ या रेन रनचे आयोजन करण्यात आले होते. अंमली पदार्थमुक्त समाजाचा संदेश जनमानसात पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित या सामाजिक उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ झाला. उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत, रत्नागिरी पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, रोटरी माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर प्रताप पुराणिक, डी.वाय.एस.पी. अभिजीत थोरात, रोटरी कर्नाटक-गोवाचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट अशोक नाईक आणि रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष अॅड. मनिष नलावडे यांच्या हस्ते झेंडा दाखवून रेन रनला सुरुवात करण्यात आली.
रत्नागिरीतील ६८० धावपटू आणि नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. पावसात धावताना धावपटूंनी ‘Say No to Drugs’चा प्रभावी संदेश देत व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी जनजागृती केली.
यावेळी बोलताना पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थविरोधी मोहीम अधिक व्यापक आणि प्रभावी स्वरूपात राबविण्यावर भर दिला. रत्नागिरी जिल्ह्यातून अमली पदार्थांचे पूर्णपणे हद्दपार करण्यासाठी तसेच अमली पदार्थांच्या व्यवहाराशी संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यासाठी कोणतीही हयगय केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. अमली पदार्थांच्या गैरव्यवहाराशी संबंधित व्यक्तींना रत्नागिरी जिल्ह्यातून तडीपार करण्यासह कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
या मोहिमेसाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री सामंत यांनी दिली. युवकांनी अमली पदार्थांपासून दूर राहून निरोगी आणि सकारात्मक जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहनही त्यांनी केले. ‘Say No to Drugs’ हा संदेश देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. यावेळी पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी उपस्थितांना व्यसनमुक्त समाजनिर्मितीचा संदेश देत युवकांनी व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला रोटरी पीडीजी प्रताप पुराणिक, रोटरी कर्नाटक-गोवाचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट अशोक नाईक, रोटरी क्लब ऑफ कुडाळचे रोटे. प्रणय तेली, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनचे रोटे. राजेश घटवाल, डॉ. संदीप करे तसेच असिस्टंट गव्हर्नर बिपीन गांधी यांची उपस्थिती होती.
‘Say No to Drugs’ हा संदेश केंद्रस्थानी ठेवून आयोजित या Rain Runमध्ये सहभागी धावपटूंनी पावसात धावत निरोगी जीवनशैली, व्यसनमुक्त युवा आणि सुरक्षित समाजाचा संदेश दिला. रोटरीच्या संकल्पनेतून आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार तसेच युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्य प्रायोजक Physio-Bot, श्री. परेश साळवी, रत्नागिरी खबरदार टीम, रत्नशिल्प ज्वेल्स, श्री. श्रीकांत भुर्के, पोदार इंटरनॅशनल स्कूल ऑफ रत्नागिरी आणि Aim Fitness Team यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
तसेच रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे सर्व पदाधिकारी व सदस्य, आयोजन समिती, स्वयंसेवक, पोलीस प्रशासन, Physio-Bot टीम, भगवान सांबरे हॉस्पिटलचे वैद्यकीय पथक, सहकारी संस्था, प्रायोजक आणि सर्व सहकार्य करणाऱ्या व्यक्तींनी घेतलेल्या अथक मेहनतीमुळे हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
यावेळी रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष अॅड. मनिष नलावडे म्हणाले, “आजची धाव ही केवळ आरोग्यासाठीची धाव नव्हती; ती व्यसनमुक्त समाजाच्या दिशेने टाकलेले एक सकारात्मक पाऊल होते. सहभागी झालेल्या प्रत्येक धावपटूने ‘Say No to Drugs’ हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.”
कार्यक्रमाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे सर्व धावपटू, स्वयंसेवक, सहकारी, प्रायोजक आणि रत्नागिरीकर नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

