(मुंबई)
राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठीचा जाहीर प्रचार मंगळवारी सायंकाळी 5.30 वाजता संपला आहे. प्रचाराच्या सभा, रॅली, मिरवणुका, जाहिराती आणि ध्वनिक्षेप यांवर बंदी लागू झाली असली, तरी उमेदवारांना थेट मतदारांच्या घरी जाऊन वैयक्तिक स्वरूपात प्रचार करण्याची मुभा कायम राहणार आहे.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले की, मतदानाच्या 48 तास आधी जाहीर प्रचार बंद करण्याची तरतूद आहे. मात्र, या कालावधीत ‘डोअर टू डोअर’ पद्धतीने, पाचपेक्षा कमी व्यक्तींच्या उपस्थितीत वैयक्तिक प्रचार करता येतो. हा नियम नवीन नसून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही तोच लागू असल्याचे त्यांनी सांगितले.
जाहीर प्रचार संपल्यानंतरही घरोगरी जाऊन प्रचार करण्यास परवानगी दिल्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. पत्रकार परिषदेत या मुद्द्यावर विचारणा झाल्यानंतर वाघमारे यांनी स्पष्ट केले की, जाहीर प्रचारामध्ये सभा, रॅली, मिरवणुका आणि माईकचा वापर यांचा समावेश होतो. मात्र, वैयक्तिक प्रचारावर कोणतीही बंदी नसते. उमेदवार मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या बाहेर मतदारांना भेटू शकतात, मात्र माईकचा वापर किंवा मोठ्या समूहात फिरणे निषिद्ध आहे.
या मुद्द्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आक्षेप घेत निवडणूक आयोगाच्या इतिवृत्तावर सवाल उपस्थित केला. घरोघरी जाऊन मत मागणे हेही प्रचारच आहे, मग प्रचाराची व्याख्या बदलली आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, कुलाबा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अडथळा आणल्याच्या आरोपांप्रकरणी महापालिका आयुक्तांकडून अहवाल मागवण्यात आला असून संबंधित व्हिडिओ फुटेजची तपासणी सुरू असल्याची माहिती वाघमारे यांनी दिली. प्राथमिक तपासणीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची चूक दिसून येत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 29 मध्ये पैसे वाटप केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्या प्रकरणातही सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे. तसेच ज्या ठिकाणी बिनविरोध निवड झाली आहे, त्या सर्व प्रकरणांची स्वतंत्र चौकशी केली जाणार असून दबाव, आमिष किंवा तक्रारींची तपासणी करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे आयोगाने स्पष्ट केले.
महानगरपालिका निवडणूक कालावधीत आतापर्यंत निवडणूक आयोगाने सुमारे 7 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. याशिवाय 5.28 कोटी रुपयांची 2 लाख 36 हजार लिटर दारू, 54.85 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ आणि 95 शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. तसेच 21,153 व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती आयोगाने दिली आहे.

