(छत्रपती संभाजीनगर/ वृत्तसंस्था)
येत्या 5 सप्टेंबर रोजी दिल्लीत जंतरमंतरपेक्षाही मोठं आंदोलन होईल, असा दावा ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे प्रमुख अभिजीत दिपके यांनी केला आहे. त्यांच्या पक्षाच्या वतीने केवळ दिल्लीत आंदोलनाचे नियोजन करण्यात आले असून, इतर ठिकाणी समर्थनार्थ आंदोलन झाल्यास त्यातून मुख्य आंदोलनाला पाठबळ मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, सोनम वांगचुक यांच्या एका वक्तव्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. मात्र, या व्हिडिओतील वक्तव्य पूर्ण सत्य नसल्याचा दावा अभिजीत दिपके यांनी केला. “व्हिडिओ पूर्ण पाहिल्यास सोनम वांगचुक यांनी आमचं कौतुकच केलं आहे,” असे त्यांनी सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबतही अभिजीत दिपके यांनी भाष्य केले. सरकारमुळेच जरांगे पाटील यांच्यावर आंदोलन करण्याची वेळ आली असून, ते आमच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीत आले होते, असा दावा त्यांनी केला. “इतकंच नाही, तर मीही दिल्लीत जाईन,” असेही दिपके यांनी सांगितले.
पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आली
दिल्लीत जंतरमंतर येथे यापूर्वी आंदोलन केल्यानंतर सरकारने काही आश्वासने दिली होती. मात्र, ती पूर्ण न केल्यामुळे पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आली असल्याची टीका अभिजीत दिपके यांनी केली. आंदोलक विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे अद्याप मागे घेण्यात आलेले नाहीत. तसेच आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना अद्याप मदत मिळालेली नाही. त्यामुळे पुन्हा मोर्चा काढावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
“सरकारकडून गुन्हे मागे घेण्याबाबत कोर्टाचं कारण सांगितलं जातं. मात्र, कोर्टानं आपण तयार असल्याचे सांगून सरकारला केवळ यादी देण्यास सांगितलं आहे. तरीही सरकारकडून यादी दिली जात नाही,” असा आरोप दिपके यांनी केला. यापूर्वी जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनापेक्षा यावेळी मोठे आंदोलन होईल, असा दावा त्यांनी केला. देशातील विविध राज्यांमध्ये आंदोलन सुरू असून आदिवासी विद्यार्थीही आंदोलनाला बसले आहेत. त्यामुळे या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास दिपके यांनी व्यक्त केला.
सोनम वांगचुक यांचा पूर्ण व्हिडिओ पाहण्याचे आवाहन
सोनम वांगचुक यांनी ‘कॉक्रोच जनता पार्टी’बाबत शंका व्यक्त करत या तरुणांमध्ये राजकीय महत्त्वाकांक्षा असल्याचे म्हटल्याचा दावा केला जात आहे. यावर अभिजीत दिपके यांनी वांगचुक यांचा पूर्ण व्हिडिओ पाहण्याचे आवाहन केले.
“मला वाटतं तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिलेला नाही. सोनम वांगचुक यांनी आम्ही पाहिलेल्या अनेक राजकीय नेत्यांपेक्षा ही मुलं चांगली असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्यात भ्रष्टाचार करण्यासारखं काही दिसत नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे,” असे दिपके म्हणाले.
“पूर्ण व्हिडिओमध्ये त्यांनी ही मुलं चांगली आणि शिकलेली असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे त्यांनी आमच्यावर अविश्वास दाखवला, असं मला वाटत नाही. सध्या राजकारणात असलेल्या लोकांपेक्षा ही मुलं चांगली आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. पुढे काय होईल, हे कोणालाही माहीत नाही, हे त्यांचे मत योग्य आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याबद्दल मला वाईट वाटलं नाही, उलट आनंद झाला,” असे स्पष्टीकरण अभिजीत दिपके यांनी दिले.
मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देणार?
मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन करण्याची वेळ का आली, यावर बोलताना ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे प्रमुख अभिजीत दिपके यांनी सरकारवर टीका केली. एखादी व्यक्ती आंदोलन करते, तेव्हा तो तिच्यासमोरचा शेवटचा पर्याय असतो. सरकारच्या अपयशामुळेच लोकांना आंदोलन करण्याची वेळ येत असल्याचे त्यांनी म्हटले.
“सरकारने समाजातील मुलांना चांगले शिक्षण आणि रोजगाराच्या संधी दिल्या असत्या, तर मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन करावं लागलं असतं का? आज राज्यात सर्वचजण आंदोलन करत आहेत. मराठा समाजातील मुलांना चांगलं शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळत नाहीत, हे सरकारचे अपयश आहे,” अशी टीका दिपके यांनी केली.
जंतरमंतरवरील आंदोलनाचा संदर्भ देत त्यांनी सरकारला जरांगे पाटील यांच्याशी लवकर चर्चा करण्याचे आवाहन केले. “जंतरमंतरवर आम्हाला सरकारनं 35 दिवस बसवून ठेवलं. 31 दिवसांनंतर सरकार आमच्याशी चर्चा करण्यासाठी आले. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत असे करू नका. त्यांच्यासोबत बसा, चर्चा करा आणि काही ना काही तोडगा काढा,” असे दिपके म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “त्यांच्या आंदोलनात मी त्यांची भेट घेणार आहे. ते दिल्लीपर्यंत आले होते, तर मीही त्यांच्यापर्यंत जाऊ शकतो,” असे दिपके यांनी सांगितले.
न्यायालयाच्या परीक्षा अडचणीच्या केंद्रांवर घेऊ नयेत
बॉम्बे हायकोर्टाची टायपिंग परीक्षा रद्द झाल्याच्या मुद्द्यावरही अभिजीत दिपके यांनी भूमिका मांडली. परीक्षा देताना संगणक, की-बोर्ड तसेच इतर तांत्रिक अडचणी आल्याने परीक्षार्थी आक्रमक झाले होते आणि त्यांनी आंदोलन सुरू केले होते. “मी केवळ विद्यार्थ्यांसोबत गेलो होतो. परीक्षा पुन्हा घेण्यात याव्यात, ही त्यांची मागणी होती आणि ती पूर्ण झाली आहे. याचे सर्व श्रेय विद्यार्थ्यांचे आहे, माझे काहीही नाही,” असे दिपके यांनी स्पष्ट केले. यापुढे ज्या परीक्षा केंद्रांवर तांत्रिक किंवा इतर अडचणी निर्माण झाल्या आहेत, त्या केंद्रांवर पुन्हा परीक्षा घेऊ नयेत, अशी मागणीही त्यांनी केली.

