( मुंबई )
कोरोना महामारी आणि ओबीसी आरक्षणाच्या पेचामुळे गेली अनेक वर्षे रखडलेल्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त लागला आहे. भारत निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या १६ स्थानिक स्वराज्य प्राधिकारी मतदारसंघांसह नागपूर पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, १८ जून रोजी मतदान होणार आहे. तर २२ जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जाणार आहेत. या निवडणुकीसोबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या नागपूर स्थानिक स्वराज्य प्राधिकारी मतदारसंघासाठीही पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे राज्यात एकूण १७ जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे.
निवडणूक आयोगाने सोमवारी अधिकृतपणे निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. १ जानेवारी २०२२ ते २९ ऑगस्ट २०२५ या कालावधीत रिक्त झालेल्या विधान परिषद जागांसाठी ही निवडणूक घेतली जाणार आहे. कोरोना महामारी, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा वाद आणि न्यायालयीन प्रक्रिया यामुळे या मतदारसंघांच्या निवडणुका दीर्घकाळ प्रलंबित राहिल्या होत्या. आता राज्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आयोगाने या प्रक्रियेला हिरवा कंदील दिला आहे.
राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने संबंधित मतदारसंघांमधील ७५ टक्क्यांहून अधिक मतदार उपलब्ध असल्याचा प्रस्ताव भारत निवडणूक आयोगाकडे सादर केला होता. त्यानुसार आयोगाने निवडणूक कार्यक्रम निश्चित केला. या निवडणुकीत महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, कटक मंडळे आणि जिल्हा परिषद सदस्य मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
नागपूर पोटनिवडणूकही चर्चेत
भाजप नेते आणि विद्यमान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे २०२२ मध्ये नागपूर स्थानिक स्वराज्य प्राधिकारी मतदारसंघातून विधान परिषदेसाठी निवडून आले होते. मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे नागपूरची जागा रिक्त झाली होती. विशेष म्हणजे नागपूर मतदारसंघातील विजयी उमेदवाराला केवळ सुमारे दीड वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे. कारण या जागेची मुदत १ जानेवारी २०२८ रोजी संपणार आहे.
या १७ मतदारसंघांत होणार निवडणूक
राज्यातील सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर-जालना या स्थानिक स्वराज्य प्राधिकारी मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे.
या निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून, महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात प्रतिष्ठेची लढत पाहायला मिळणार आहे.

