(ठाणे / वृत्तसंस्था)
भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी परिसरातील अकलोली येथे तानसा नदीपात्रात बुडून दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारच्या सुट्टीच्या निमित्ताने कुटुंबासोबत फिरण्यासाठी आलेल्या अरुण चौहान (वय १३) आणि आयुष चौहान (वय १०) या भावंडांना नदीपात्रातील पाण्याच्या खोलीचा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. या घटनेने चौहान कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, अकलोली आणि वज्रेश्वरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
विरार येथे रिक्षाचालक असलेले राम बच्चन चौहान हे पत्नी, दोन मुले अरुण आणि आयुष तसेच एका लहान मुलीसह रविवारच्या सुट्टीच्या निमित्ताने वज्रेश्वरी परिसरात फिरण्यासाठी आले होते. अकलोली येथील गरम पाण्याच्या कुंडावर आंघोळ केल्यानंतर चौहान कुटुंब तानसा नदीपात्राजवळ गेले. त्यावेळी अरुण आणि आयुष हे दोघे भाऊ नदीच्या पात्रात आंघोळीसाठी गेले.
नदीतील पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने दोघेही अचानक खोल पाण्यात ओढले गेले आणि बुडू लागले. त्यावेळी आई काहीतरी खाण्यासाठी आणण्यासाठी बाजूला गेली होती, तर वडील रिक्षा साफ करत होते. काही वेळाने दोन्ही मुले दिसत नसल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी आरडाओरड सुरू केली.
आई-वडिलांचा आक्रोश ऐकून स्थानिक तरुण आणि उपस्थित नागरिकांनी तातडीने नदीपात्रात शोध सुरू केला. सुमारे तासभराच्या शोधानंतर आंघोळ करत असलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर दोन्ही भावंडे आढळून आली. मात्र, त्यांच्या नाकातोंडात पाणी गेल्याने दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला होता.
अरुण राम बच्चन चौहान आणि आयुष राम बच्चन चौहान यांच्या मृत्यूची माहिती मिळताच आई-वडिलांनी नदीपात्राजवळच हंबरडा फोडला. काही वेळापूर्वी आनंदाने कुटुंबासोबत फिरण्यासाठी आलेल्या आई-वडिलांवर अवघ्या काही क्षणांत दोन मुलांना गमावण्याची वेळ आली. या घटनेने अकलोली आणि वज्रेश्वरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी गणेशपुरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

