(खेड / वार्ताहर)
टाटा पंच मोटार (एमएच १२ टीवाय ४३८१) गोव्याच्या दिशेने जात होती. लवेल पेट्रोल पंपासमोर आल्यानंतर रस्त्याच्या कडेला चालत असलेल्या दोन स्थानिक अल्पवयीन तरुणींना मोटारीने जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, दोन्ही तरुणी गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि मोटार रस्त्यालगतच्या खड्ड्यात जाऊन पलटी झाली.
रविवारी सायंकाळी सुमारे ५.१५ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. धडकेनंतर चालकाचे मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने टाटा पंच रस्त्यालगतच्या खड्ड्यात जाऊन पलटी झाली. या दुर्घटनेत दोन्ही तरुणी गंभीर जखमी झाल्या असून, मोटारीतील तीन जणही जखमी झाले आहेत. या अपघातात एकूण पाच जण जखमी झाले आहेत.
या अपघातात लवेल येथील यास्मिन निजाम पाटाईत (वय १४) आणि मानसी केसवन शर्मा (वय १४) या दोन्ही अल्पवयीन तरुणी गंभीर जखमी झाल्या आहेत. तसेच टाटा पंचमधून प्रवास करणारे तीन जणही जखमी झाले आहेत. कारमधील जखमींमध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. सर्व जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत जखमींना वाहनातून बाहेर काढण्यास मदत केली. अपघातात टाटा पंचचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोटार रस्त्यालगतच्या खड्ड्यात पलटी झाल्याने महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला.
दरम्यान, दोन्ही अल्पवयीन तरुणींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते, हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, मोटारीचा वेग किती होता आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण कशामुळे सुटले, याबाबत तपास सुरू आहे.

