(चिपळूण / प्रतिनिधी)
आईवर अचानक मगरीने हल्ला केल्यानंतर प्रसंगावधान राखत अतुलनीय धाडस दाखवून आईचे प्राण वाचवणाऱ्या अवघ्या दहा वर्षांच्या स्वर्णी भूपेंद्र पवार हिच्या शौर्याची सर्व स्तरांतून दखल घेतली जात आहे. स्वर्णी ही राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी निश्चितच पात्र असून, तिच्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यासाठी शाळेला वनविभागाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई यांनी केले.
भगवान परशुराम पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या आर. सी. काळे माध्यमिक विद्यालयात स्वर्णी पवार हिच्या अतुलनीय धाडसाबद्दल विशेष गौरव सोहळ्याचे आयोजन रामकृष्ण स्मृती सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई आणि उपविभागीय पोलिस अधिकारी तथा डीवायएसपी प्रकाश बेले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. अभय सहस्रबुद्धे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.
यावेळी गिरीजा देसाई आणि डीवायएसपी प्रकाश बेले यांच्या हस्ते स्वर्णी पवार हिचा विशेष सत्कार करण्यात आला. स्वर्णीने मगरीच्या हल्ल्यात सापडलेल्या आपल्या आईला वाचविण्यासाठी प्रसंगावधान राखून धाडसाने केलेल्या प्रयत्नांचे उपस्थितांनी कौतुक केले.
गिरीजा देसाई यांनी स्वर्णीच्या शौर्याचे कौतुक करताना तिच्यावर झालेल्या संस्कारांचेही विशेष कौतुक केले. शाळेतून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिक्षणाबद्दल त्यांनी शिक्षण संस्थेचे अभिनंदन केले. स्वर्णी राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी पात्र असून, तिच्या शौर्याची योग्य पद्धतीने दखल घेण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी वनविभागाच्या वतीने आवश्यक ते सहकार्य करण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.
डीवायएसपी प्रकाश बेले यांनीही स्वर्णीच्या धाडसाचे विशेष कौतुक केले. आजच्या काळात अनेक मुले आणि मोठी माणसे झुरळ, पाल यांसारख्या छोट्या प्राण्यांनाही घाबरतात; अशा परिस्थितीत अवघ्या दहा वर्षांच्या मुलीने मगरीसारख्या धोकादायक प्राण्याला न घाबरता आईचे प्राण वाचवण्यासाठी दाखवलेले धाडस निश्चितच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रसंगाच्या वेळी क्षणाचाही विलंब न करता घेतलेला निर्णय, दाखवलेले धैर्य आणि त्यामुळे आईचे वाचलेले प्राण या सर्व बाबी स्वर्णीच्या शौर्याची साक्ष देतात. तिला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळावा यासाठी शाळा आणि संस्थेने योग्य पद्धतीने प्रस्ताव सादर करावा. त्यासाठी पोलिस विभागाच्या वतीने आवश्यक ते सहकार्य केले जाईल आणि हा बहुमान आपल्या जिल्ह्याला मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास बेले यांनी व्यक्त केला.
यावेळी डीवायएसपी प्रकाश बेले यांनी विद्यार्थ्यांना प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी अभ्यासाचे नियोजन कसे करावे, याबाबत स्वतःच्या अनुभवांच्या आधारे मार्गदर्शन केले. शाळेतील विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचेही त्यांनी कौतुक केले.
या कार्यक्रमात स्वर्णी पवार हिच्यासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. गांधी रिसर्च फाउंडेशनच्या ‘गांधी तीर्थ स्वच्छ शाळा’ राज्यस्तरीय स्पर्धेत विशेष पुरस्कार मिळाल्याबद्दल समन्वयक विशाखा माळी यांचा, तालुकास्तरीय निबंध व वक्तृत्व स्पर्धेत यश मिळविल्याबद्दल आर्या जोशी आणि दर्शन पाटील यांचा तसेच तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थी कलाकारांचा आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका उज्वला दवंडे यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मुख्याध्यापक विनायक माळी यांनी कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट करताना शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची आणि अभिनव शिक्षण पद्धतीची माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात डॉ. अभय सहस्रबुद्धे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. स्वर्णी पवार हिला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळवून देण्यासाठी शाळा आणि संस्था पुढाकार घेऊन प्रयत्न करणार असून, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुण्या गिरीजा देसाई आणि डीवायएसपी प्रकाश बेले यांचा संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश पवार यांनी केले. विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

