(चिपळूण /रत्नागिरी प्रतिनिधी)
मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण पॉवर हाऊस परिसरात गतिरोधक ओलांडत असताना भरधाव बारा चाकी ट्रकने इर्टिगा कारला पाठीमागून धडक दिल्याची घटना १७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री घडली. या अपघातात कारमधील श्वेता शिवाजी गुरव आणि शिवाजी बाबाजी गुरव हे दोघे जखमी झाले. या प्रकरणी ट्रकचालक लालचंद कुंज महातो याच्याविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १७ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे २.५५ वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण पॉवर हाऊस येथे हा अपघात झाला. संकेत शिवाजी गुरव (वय ३५, व्यवसाय नोकरी, रा. कल्याण, मुंबई) यांच्या फिर्यादीनुसार, ते संबंधित ठिकाणी आले असताना गतिरोधक ओलांडत होते. त्याचवेळी भारत बेंझ कंपनीच्या एमएच १२ एलटी २०५७ क्रमांकाच्या बारा चाकी ट्रकचा चालक लालचंद कुंज महातो याने वाहन बेदरकारपणे आणि भरधाव वेगाने चालवून एमएच ०५ ईक्यू ३५२४ क्रमांकाच्या इर्टिगा कारला पाठीमागून धडक दिली. या धडकेत कारमधील श्वेता गुरव आणि शिवाजी गुरव जखमी झाले. अपघातास ट्रकचालकाचे वाहन चालविण्याचे निष्काळजीपणाचे कृत्य कारणीभूत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात ट्रकचालक लालचंद कुंज महातो (सध्या रा. मिरकरवाडा, रत्नागिरी; मूळ रा. तोफचाची, धनबाद, झारखंड) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २८१, १२५(अ) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा पुढील तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.


