(चिपळूण /रत्नागिरी प्रतिनिधी)
जड वाहनांच्या वाहतुकीसाठी प्रशासनाने पर्यायी मार्ग निश्चित करून स्पष्ट आदेश जारी केलेला असतानाही त्याची सर्रास पायमल्ली केल्याचा प्रकार खडपोली येथे समोर आला आहे. प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत अवजड ट्रक भरधाव वेगाने चालविल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक नाल्याच्या कठड्यावर आदळून अडकला. सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी टळली. मात्र, मुख्य मार्गावरील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला.
ही घटना २२ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी सुमारे एकच्या सुमारास खडपोली येथील सुकाई मंदिराजवळील वळणावर घडली. या प्रकरणी अलोरे-शिरगाव पोलिसांनी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळी पूल परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी चिपळूणच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी जड वाहनांसाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था निश्चित केली होती. त्यानुसार प्रशासनाने वाहतुकीबाबत आदेशही जारी केला होता. मात्र, या आदेशाची पर्वा न करता राकेश संजय चव्हाण (वय २६, रा. शाहगड, आझमगड, उत्तर प्रदेश) याने त्याच्या ताब्यातील अवजड ट्रक (एमएच ०६ बीडी ०८३२) गाणे खडपोली ते पेढंबे ब्रिज या मार्गावर भरधाव वेगाने चालविल्याचा आरोप आहे.
खडपोली येथील सुकाई मंदिराजवळील वळणावर ट्रक चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेला आणि थेट नाल्याच्या कठड्यावर आदळला. त्यानंतर ट्रक तेथेच अडकून पडला. अवजड ट्रक अपघातग्रस्त झाल्याने मुख्य मार्गावरील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांसह नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला. प्रशासनाने जड वाहनांसाठी स्वतंत्र पर्यायी व्यवस्था करूनही त्याचे पालन न झाल्यानेच ही परिस्थिती ओढवली, असा पोलिसांचा आरोप आहे. त्यामुळे नियम केवळ कागदावरच राहणार का आणि आदेश धाब्यावर बसविणाऱ्या वाहनचालकांवर नियंत्रण कोण ठेवणार, असा प्रश्नही या घटनेनंतर उपस्थित झाला आहे.
चालकाविरोधात तीन कलमांखाली गुन्हा
या प्रकरणी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी सचिन आप्पासो कोळी यांच्या फिर्यादीवरून चालक राकेश चव्हाण याच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ मधील कलम २२३, २८१ आणि २८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशासनाच्या आदेशाची अवज्ञा करणे, निष्काळजीपणे वाहन चालविणे आणि सार्वजनिक मार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. प्रशासनाने आदेश काढायचे आणि वाहनचालकांनी ते धाब्यावर बसवायचे, असा प्रकार सुरू राहिल्यास अपघातानंतरच जाग येणार का? खडपोलीतील या घटनेने जड वाहनांच्या वाहतुकीवरील नियंत्रण आणि प्रशासनाच्या आदेशाच्या अंमलबजावणीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे.

