(रत्नागिरी / वृत्तसंस्था)
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील रस्ते, वीजपुरवठा आणि एसटी बसफेऱ्यांच्या प्रश्नांवर जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या सभेत तीव्र चर्चा झाली. नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीची गंभीर दखल घेत बांधकाम समितीचे सदस्य महेंद्र झापडेकर यांनी प्रशासनाला धारेवर धरत संबंधित समस्या गणेशोत्सवापूर्वी मार्गी लावण्याची सक्त सूचना केली. त्यांच्या आक्रमक पाठपुराव्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने काही रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू केले आहे.
जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या नुकत्याच झालेल्या सभेत रत्नागिरी तालुक्यातील विविध रस्त्यांच्या दयनीय अवस्थेचा मुद्दा प्रकर्षाने उपस्थित करण्यात आला. काजघटी ते देवधे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे, चांदेराई-कुरतडे रस्ता तसेच चिद्रवली-बौद्धवाडी ते लोखंडवाडी मार्गाची झालेली खराब अवस्था यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने नागरिक गावाकडे येणार असल्याने या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी झापडेकर यांनी केली.
गणेशोत्सवापूर्वी संबंधित रस्ते वाहतुकीस योग्य स्थितीत आणावेत, अशी स्पष्ट सूचना त्यांनी प्रशासनाला केली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेत अवघ्या दोन दिवसांत काही ठिकाणी रस्ते दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. सोमेश्वर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्याने प्रशासनाने तातडीने कार्यवाही केल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, रस्त्यांच्या प्रश्नासोबतच रत्नागिरी जिल्ह्यातील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा मुद्दाही सभेत उपस्थित करण्यात आला. महावितरणच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत वारंवार वीज जाण्यामुळे नागरिकांना होणारी गैरसोय तातडीने दूर करण्याच्या सूचना करण्यात आल्या.
वीजवाहिन्यांना अडथळा ठरणारी झाडे आणि झुडपे हटविण्यात येतील तसेच भविष्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होणार नाही, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी यावेळी आश्वासन दिले.
सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्नही सभेत चर्चेला आला. हरचिरी आणि माडवकवाडी परिसरातील एसटी बसफेऱ्या अनियमित असल्याने शालेय विद्यार्थी, नोकरदार आणि ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. या भागात एसटी बसफेऱ्या नियमित आणि वेळेत सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली. याबाबत एसटी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे मान्य केले.
गणेशोत्सवाच्या काळात रत्नागिरी जिल्ह्यात रस्ते वाहतूक, वीजपुरवठा आणि सार्वजनिक वाहतूक या तिन्ही सेवांवर मोठा ताण येतो. त्यामुळे सणाच्या आधीच संबंधित यंत्रणांनी नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात, यासाठी लोकप्रतिनिधींकडून प्रशासनावर दबाव वाढविला जात आहे. महेंद्र झापडेकर यांच्या आक्रमक पाठपुराव्यानंतर रस्ते दुरुस्तीला सुरुवात झाल्याने गणेशोत्सवासाठी गावाकडे येणाऱ्या चाकरमान्यांसह स्थानिक नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, रस्ते दुरुस्तीच्या कामाची पालकमंत्री उदय सामंत यांनीही दखल घेत बांधकाम विभागाला आवश्यक त्या सूचना दिल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी रत्नागिरीतील प्रमुख खराब रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण होते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

