(संगमेश्वर / प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळपिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी दापोलीतील नवभारत छात्रालय परिवार आणि अश्विनी ॲग्रो फार्म यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कलमे व रोपे वाटप उपक्रम राबविण्यात आला. दापोली, मंडणगड, चिपळूण आणि लांजा या चार तालुक्यांतील नऊ गावांमधील तब्बल ६१३ शेतकऱ्यांना एकूण ४११६ कलमे व रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. गेल्या बारा वर्षांपासून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सुरू असलेल्या या उपक्रमाचे हे तेरावे वर्ष आहे.
कुणबी सेवा संघ, दापोलीअंतर्गत नवभारत छात्रालय परिवार आणि सौ. सुषमा व प्रा. प्रभाकर शिंदे यांच्या अश्विनी ॲग्रो फार्म यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. कुणबी सेवा संघाचे अध्यक्ष प्रा. प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना फळझाडांची लागवड, निगा आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाबाबत मार्गदर्शनही करण्यात आले.
या उपक्रमाचा सर्वाधिक लाभ दापोली तालुक्यातील पाच गावांमधील ३०५ शेतकऱ्यांना मिळाला. ओणनवसे येथील ५०, तेरेवायंगणी ७५, सोवेली ६०, भाटघर ६० आणि रुखी येथील ६० शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश होता. मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ येथील ७० आणि तोंडली येथील ९०, अशा एकूण १६० शेतकऱ्यांना लाभ मिळाला. चिपळूण तालुक्यातील दळवटणे येथील ४८ तर लांजा तालुक्यातील चाफे येथील १०० शेतकऱ्यांनाही मोफत कलमे व रोपे देण्यात आली.
ओणनवसे, तेरेवायंगणी, सोवेली, दळवटणे, म्हाप्रळ आणि चाफे या गावांतील प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला चार कोकम रोपे, दोन काळीमिरी रोपे आणि दोन वर्षांचे एक चिकू कलम देण्यात आले. तर रुखी, सोवेली आणि तोंडली येथील प्रत्येक शेतकऱ्याला दोन कोकम रोपे, दोन लिंबू रोपे, दोन काळीमिरी रोपे आणि दोन वर्षांचे एक चिकू कलम देण्यात आले.
या उपक्रमातून १९१२ कोकम रोपे, १२४६ काळीमिरी रोपे, ६२३ दोन वर्षांची चिकू कलमे, ३३५ लिंबू रोपे, पाच फणस रोपे आणि १५ जांब रोपे वितरित करण्यात आली. यातील कोकम, चिकू, लिंबू, फणस आणि जांब रोपे नवभारत छात्रालय परिवाराच्या कृषी केंद्रातून, तर काळीमिरीची रोपे आणि चिकू कलमांचा मोठा हिस्सा अश्विनी ॲग्रो फार्ममधून उपलब्ध करून देण्यात आला.
शेतकऱ्यांना केवळ कलमे-रोपे देण्यापुरता हा उपक्रम मर्यादित न ठेवता त्यांच्या लागवडीबाबत तांत्रिक मार्गदर्शनही करण्यात आले. प्रा. प्रभाकर शिंदे आणि कुणबी सेवा संघाचे सदस्य डॉ. राजन खांडेकर यांनी फळझाडांच्या लागवडीची पद्धत, त्यातून मिळणारे आर्थिक उत्पन्न आणि लागवडीचे अर्थशास्त्र याबाबत मार्गदर्शन केले. यंदा वाटपाच्या वेळी प्रत्यक्ष लागवड प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले.
उपक्रमाची माहिती आणि लाभार्थी शेतकऱ्यांशी समन्वय साधण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत, सदस्य प्रभाकर तेरेकर आणि सुनील गुरव यांनी विविध गावांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. ओणनवसे येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अविनाश पाटील, दापोली कृषी महाविद्यालयाच्या विस्तार शिक्षण विभागातील कनिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. प्रवीण झगडे, ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमातील कृषिकन्या, मंडणगड येथील कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष दिनेश सापटे, लांजा कुणबी सेवा संघाचे अध्यक्ष शांताराम गाडे, दापोली पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी दिनेश राणे, कुणबी सेवा संघाचे खजिनदार प्रदीप इप्ते आणि सदस्य सुनील गुरव यांनीही उपक्रमाच्या अंमलबजावणीत सहकार्य केले.
शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कलमे-रोपे उपलब्ध करून देणे, वाटपाचे नियोजन करणे, मार्गदर्शन कार्यक्रमांचे वेळापत्रक तयार करणे आणि संपूर्ण उपक्रमाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कुणबी सेवा संघाचे सरचिटणीस हरिश्चंद्र कोकमकर यांनी नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली. त्यामुळे हा उपक्रम यशस्वीपणे राबविता आला.
कुणबी सेवा संघाचे अध्यक्ष प्रा. प्रभाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत, डॉ. राजन खांडेकर, सरचिटणीस हरिश्चंद्र कोकमकर, खजिनदार प्रदीप इप्ते, सदस्य प्रभाकर तेरेकर, दिनेश राणे, सुनील गुरव आणि शिवप्रसाद चौगुले यांनी या समाजोपयोगी उपक्रमासाठी परिश्रम घेतले.
उपक्रमाला शेतकरी, महिला आणि गावातील पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वितरित करण्यात आलेल्या कलमे-रोपांची योग्य प्रकारे लागवड करून त्यांची निगा राखू आणि या उपक्रमाचे ऋण फेडू, अशी भावना लाभार्थी शेतकऱ्यांनी व्यक्त केली. प्रा. प्रभाकर शिंदे, सौ. सुषमा शिंदे आणि राजकिरण शिंदे यांच्यासह दोन्ही संस्थांचे शेतकऱ्यांनी आभार मानले.
या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कुणबी सेवा संघाचे कर्मचारी सुनील ठाकूर, सौ. वर्षा गोरीवले, सौ. रेणुका शिंदे, सौ. कीर्ती घाग, सुजित गोलांबडे, समीर शिबे, सौ. रिया पागडे, श्रीमती सुवर्णा अबगुल, सौ. मानसी मुलुख आणि सौ. श्रावणी गावडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

