(ठाणे / वृत्तसंस्था)
ठाणे शहरातील बहुजन चळवळीत सक्रिय असलेले आणि ठाणे जिल्हा बहुजन विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. नितीन श्रीपत तांबे (वय 42) यांचे शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. दुचाकीवरून घरी परतत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते रस्त्यावर कोसळले. स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे ठाणे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
नितीन तांबे हे महापालिका कामगार नेते श्रीपत तांबे यांचे थोरले सुपुत्र होते. बहुजन विद्यार्थी संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी काम केले. शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांवर त्यांनी मोर्चे, आंदोलने आणि निवेदनांच्या माध्यमातून आवाज उठवला होता.
वर्तमानपत्र घेऊन घरी परतताना काळाचा घाला
शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास नितीन तांबे हे वर्तमानपत्र खरेदी करण्यासाठी कासार आळी परिसरात आले होते. वर्तमानपत्र घेतल्यानंतर ते आपल्या दुचाकीवरून घरी परतत होते. याच वेळी दुचाकी चालवत असतानाच त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. झटका आल्याने दुचाकीचा तोल गेला आणि ते रस्त्यावर बेशुद्ध होऊन कोसळले. घटना पाहताच स्थानिक नागरिक मदतीसाठी धावून आले. त्यांनी तातडीने नितीन तांबे यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दुचाकीवरून कोसळतानाचा CCTV व्हिडीओ समोर
या घटनेनंतर नितीन तांबे दुचाकीवरून अचानक खाली कोसळल्याचा CCTV व्हिडीओ समोर आला आहे. या दृश्यांमध्ये ते दुचाकीवरून जात असताना अचानक नियंत्रण गमावून रस्त्यावर कोसळताना दिसत आहेत. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा
नितीन तांबे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला. शाळा आणि महाविद्यालयातील प्रवेशापासून शिष्यवृत्ती, शैक्षणिक सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या इतर प्रश्नांपर्यंत त्यांनी विविध स्तरांवर आवाज उठवला होता. त्यांच्या निधनामुळे बहुजन विद्यार्थी संघटनेसह विद्यार्थी आणि सामाजिक क्षेत्रातून दुःख व्यक्त होत आहे.
अलीकडच्या काळात तरुण आणि मध्यमवयीन व्यक्तींना अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याच्या घटना चर्चेत आल्या आहेत. क्रिकेट खेळताना, व्यायाम करताना, कार्यालयात किंवा दैनंदिन कामकाजादरम्यान अचानक हृदयविकाराचा झटका आल्याच्या घटना समोर येत आहेत. नितीन तांबे यांच्या अचानक निधनामुळेही अशा घटनांबाबत पुन्हा चिंता व्यक्त होत आहे.

