(व्हँकूव्हर / बीजिंग)
वैद्यकीय आणि अवयव प्रत्यारोपण क्षेत्रात क्रांतिकारी प्रगती साधण्यात आली आहे. कॅनडा आणि चीनमधील शास्त्रज्ञांच्या संयुक्त चमूने अशी ‘युनिव्हर्सल किडनी’ तयार केली आहे, जी सैद्धांतिकदृष्ट्या कोणत्याही रक्तगटाच्या रुग्णाला यशस्वीरित्या प्रत्यारोपित करता येऊ शकते. या संशोधनामुळे किडनी प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षा यादीत असलेल्या लाखो रुग्णांसाठी नवी आशेची किरणे निर्माण झाली आहेत.
रक्तगट जुळवणीची आवश्यकता नाही
सध्या किडनी प्रत्यारोपणासाठी दाता आणि रुग्णाचा रक्तगट जुळणे अत्यावश्यक असते. त्यामुळे ‘ओ’ रक्तगटाच्या रुग्णांना सर्वाधिक प्रतीक्षा करावी लागते. आकडेवारीनुसार, अमेरिकेत दररोज सरासरी ११ रुग्णांना किडनी न मिळाल्याने जीव गमवावा लागतो, ज्यात बहुतांश रुग्ण ‘ओ’ रक्तगटाचे असतात. या नव्या प्रक्रियेत शास्त्रज्ञांनी ‘ए’ रक्तगटाची किडनी घेतली आणि ती ‘ओ’ रक्तगटात रूपांतरित केली. यासाठी त्यांनी विशिष्ट प्रकारच्या एन्झाईमचा वापर केला, जे रक्तगट ठरवणारे साखरेचे रेणू काढून टाकतात. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, ही एन्झाईम्स ‘मॉलिक्युलर कात्री’सारखी काम करतात, म्हणजेच अवयवावरचे अँटिजेन थर काढून टाकून ती किडनी ‘एबीओ अँटिजेन-मुक्त’ बनवतात.
संशोधन अद्याप प्रारंभिक टप्प्यात
चाचण्यांमध्ये तीन दिवसांनंतर रूपांतरित किडनीवर पुन्हा ‘ए’ रक्तगटाचे काही अंश दिसले, ज्यामुळे सौम्य रोगप्रतिकार प्रतिक्रिया झाली. मात्र ही प्रतिक्रिया सामान्य प्रत्यारोपणाच्या तुलनेत अत्यंत कमी तीव्र होती. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, हे संशोधन वैद्यकीय इतिहासातील एक महत्त्वपूर्ण पाऊल असले तरी, मानवांवर चाचण्या सुरू करण्यापूर्वी अजून काही तांत्रिक आव्हानं पूर्ण करावी लागतील. हे संशोधन प्रतिष्ठित ‘नेचर बायोमेडिकल इंजिनिअरिंग’ या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

