( मुंबई )
हाजी अली दर्गा येथे जगातील सर्वात उंच राष्ट्रध्वज उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव पुढे आला आहे. या संदर्भात महाराष्ट्र सरकारकडे अधिकृत परवानगीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती दर्गा ट्रस्टचे विश्वस्त सुहेल खांडवानी यांनी दिली. हा ध्वज उभारला गेल्यास मुंबईतील या ऐतिहासिक धार्मिक स्थळाची ओळख जागतिक स्तरावर अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
वरळी किनाऱ्यापासून ५०० मीटर अंतरावर दर्गा
मुंबईतील हाजी अली दर्गा हा वरळी किनाऱ्यापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर समुद्रातील छोट्या बेटावर वसलेला आहे. येथे १५व्या शतकातील प्रसिद्ध सूफी संत पीर हाजी अली शाह बुखारी यांची कबर आहे. हे स्थळ सर्वधर्मीयांसाठी श्रद्धेचे केंद्र असून दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात.
हाजी अली दर्गा भारताच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावतो. विविध धर्मांचे लोक येथे येऊन प्रार्थना करतात. “हाजी अली दर्गा ही आस्था, एकता आणि सर्वधर्म समभावाचे प्रतीक आहे. येथे राष्ट्रध्वज उभारल्याने देशभक्तीचा संदेश अधिक व्यापक पातळीवर पोहोचेल,” असे सुहेल खांडवानी यांनी सांगितले.
समुद्रकिनारी मजबूत रचना उभारणार
ध्वज समुद्रकिनाऱ्याजवळ उभारला जाणार असल्याने विशेष पाइलिंग तंत्रज्ञान आणि उच्च दर्जाच्या धातूचा वापर करून मजबूत संरचना तयार केली जाणार आहे. समुद्रातील वारे आणि हवामानाचा परिणाम कमी करण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम व्यवस्था केली जाईल, असेही ट्रस्टकडून स्पष्ट करण्यात आले.
सर्वधर्मीय सेहरी कार्यक्रमातून एकतेचा संदेश
दरम्यान, हाजी अली दर्गा ट्रस्ट आणि माहिम मखदूम शाह बाबा दरगाह ट्रस्ट यांनी लेजेंड ग्रुप यांच्या सहकार्याने विशेष सेहरी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी, शीख आणि बौद्ध धर्मगुरूंनी सहभाग घेत सामाजिक एकतेचा संदेश दिला.
पर्यटन आणि धार्मिक महत्त्व वाढणार
हा राष्ट्रध्वज उभारला गेल्यास मुंबई मधील या ऐतिहासिक स्थळाचे पर्यटन आणि धार्मिक महत्त्व अधिक वाढेल, तसेच देशाच्या एकतेचा आणि देशभक्तीचा संदेश जगभर पोहोचेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर हा प्रकल्प प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे.

