मुंबई, पुणे, बेंगळुरू यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये आपण एखादी वस्तू ऑनलाइन ऑर्डर केली की क्षणातच ती आपल्या दारात येते. काही प्लॅटफॉर्म तर किराणा, दूध, ब्रेड, स्नॅक्स, घरगुती वस्तू अशा अनेक वस्तू अवघ्या 5 ते 10 मिनिटांत पोहोचवण्याचे आश्वासन देतात. मग मनात सहज प्रश्न येतो, एवढ्या कमी वेळात हे शक्य तरी कसे होते?
याचे उत्तर केवळ डिलिव्हरी बॉयच्या वेगात नाही. त्यामागे तंत्रज्ञान, छोट्या गोदामांचे जाळे, GPS, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा आणि अतिशय वेगाने काम करणारी लॉजिस्टिक व्यवस्था असते.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची ऑर्डर दूरच्या मोठ्या दुकानातून किंवा शहराच्या दुसऱ्या टोकावरून येत नसते. तुमच्या परिसराच्या अगदी जवळच ‘डार्क स्टोअर’ नावाची छोटी गोदामे असतात. ही सामान्य दुकानांसारखी ग्राहकांसाठी खुली नसतात. तेथे ऑनलाइन ऑर्डर पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय वस्तूंचा साठा ठेवला जातो.
समजा, पुण्यातील एखाद्या परिसरात तुम्ही दूध, ब्रेड आणि बिस्किटे ऑर्डर केली. ऑर्डर करताच अॅप तुमचे लोकेशन ओळखते आणि तुमच्या जवळील कोणत्या डार्क स्टोअरमध्ये या वस्तू उपलब्ध आहेत, हे तपासते. त्यानंतर ऑर्डर त्या स्टोअरमध्ये काही सेकंदांत पोहोचते.
येथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडते. डार्क स्टोअरमध्ये वस्तू सामान्य दुकानाप्रमाणे मनमानी पद्धतीने ठेवलेल्या नसतात. प्रत्येक वस्तूची ठरावीक जागा असते. कोणती वस्तू कोणत्या रॅकवर आहे, याची माहिती सिस्टममध्ये असते. त्यामुळे ऑर्डर मिळाल्यानंतर कर्मचारी संपूर्ण गोदामात वस्तू शोधत फिरत नाही. तो थेट संबंधित रॅकवर जातो, वस्तू घेतो आणि पॅकेट तयार करतो.
यानंतर जवळच्या उपलब्ध डिलिव्हरी पार्टनरला ऑर्डर दिली जाते. येथे GPS आणि सॉफ्टवेअरची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. तुमच्या घरापासून कोणता डिलिव्हरी पार्टनर जवळ आहे, कोणता रस्ता तुलनेने जलद आहे, त्याच्याकडे आधीपासून दुसरी ऑर्डर आहे का आणि सध्याची वाहतूक कशी आहे, अशा अनेक गोष्टींचा विचार सिस्टम करते.
म्हणूनच डिलिव्हरी बॉय तुमची ऑर्डर मिळाल्यानंतर घरातून किंवा त्याच्या कोणत्या ऑफिसमधून निघत नाही. तो अनेकदा आधीपासूनच तुमच्या परिसरात असतो. ऑर्डर तयार होताच त्याला ती मिळते आणि तो थेट ग्राहकाच्या दिशेने निघतो.
या संपूर्ण प्रक्रियेत वेळ वाचवण्यासाठी कंपन्या ग्राहकांच्या खरेदीच्या सवयींचाही अभ्यास करतात. एखाद्या परिसरात दूध, ब्रेड, पाणी, स्नॅक्स किंवा इतर वस्तूंची मागणी जास्त असेल तर त्या वस्तूंचा पुरेसा साठा जवळच्या डार्क स्टोअरमध्ये आधीच ठेवला जातो. म्हणजे ग्राहकाने ऑर्डर करण्यापूर्वीच कंपनीने संभाव्य मागणीचा अंदाज घेतलेला असतो.
यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचाही वापर होतो. कोणत्या परिसरात कोणत्या वस्तूंची मागणी वाढू शकते, कोणत्या वेळी जास्त ऑर्डर्स येतात, कोणत्या वस्तूंचा साठा किती ठेवावा आणि कोणत्या डिलिव्हरी पार्टनरला कोणती ऑर्डर द्यावी, यासारख्या निर्णयांसाठी मोठ्या प्रमाणावर डेटाचा वापर केला जातो.
यामुळे ‘10 मिनिटांची डिलिव्हरी’ म्हणजे ऑर्डर मिळाल्यानंतर शून्यापासून संपूर्ण प्रक्रिया सुरू होऊन दहा मिनिटांत पूर्ण होणे असे नाही. प्रत्यक्षात त्यामागची तयारी अनेक तास आधीपासून सुरू असते. वस्तू योग्य ठिकाणी पोहोचवून ठेवणे, स्टॉकचे नियोजन करणे, कर्मचारी आणि डिलिव्हरी पार्टनर्स उपलब्ध ठेवणे आणि सॉफ्टवेअरला सर्व माहिती देणे, हे काम सतत सुरू असते.
म्हणून तुम्ही अॅपवर ‘Order’ बटण दाबता तो क्षण या संपूर्ण यंत्रणेतील शेवटच्या टप्प्याची सुरुवात असते. त्याआधी कंपनीने तुमच्या ऑर्डरसाठी तुमच्या सर्चिंगप्रमाणे आवश्यक असलेली बरीच तयारी करून ठेवलेली असते.
थोडक्यात सांगायचे तर, डिलिव्हरी बॉय वेगाने गाडी चालवतो म्हणून वस्तू 10 मिनिटांत पोहोचत नाही. ग्राहकाच्या जवळ गोदाम, गोदामात योग्य ठिकाणी वस्तू, परिसरात उपलब्ध डिलिव्हरी पार्टनर आणि या सर्वांना जोडणारे स्मार्ट सॉफ्टवेअर, या सगळ्यांच्या एकत्रित कामामुळे काही मिनिटांत वस्तू आपल्या दारात पोहोचते.
म्हणजेच आपण मोबाईलवर फक्त एक बटन दाबतो, पण त्या एका क्लिकच्या मागे अनेक लोक, अनेक संगणकीय प्रक्रिया आणि एक अत्यंत नियोजनबद्ध लॉजिस्टिक व्यवस्था काही मिनिटांत कामाला लागलेली असते.
हीच आहे आधुनिक ‘क्विक कॉमर्स’ची खरी कमाल!

