(सिंधुदुर्ग / वेंगुर्ले)
वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे-वरचीवाडी येथे २२ वर्षीय युवकाचा घरात मृतावस्थेत आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली. बुधवार, २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी राहत्या घरातील हॉलमध्ये साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. राज गोविंद नाईक (२२) असे मृत युवकाचे नाव असून, या घटनेने वेतोरे गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज नाईक हा आपल्या आई-वडिलांसोबत वेतोरे येथे राहत होता. त्याचे वडील शेती करतात, तर आई कणकवली न्यायालयात नोकरीस आहेत. राज हा मुळदे येथील हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयात अंतिम वर्षाचे शिक्षण घेत होता.
बुधवारी राजची आई नेहमीप्रमाणे कामासाठी घराबाहेर गेली होती. सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास त्याचे वडील गुरांसाठी चारा आणण्यासाठी घराबाहेर गेले. त्यानंतर सायंकाळी सुमारे ६ वाजता ते घरी परतले असता, घरातील हॉलमध्ये राज मृतावस्थेत आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच शेजारील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. या प्रकरणी वेंगुर्ले पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
राज हा वेतोरे येथील गोविंद उर्फ दीपक नाईक यांचा एकुलता एक मुलगा होता. मनमिळाऊ स्वभावाच्या राजचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबीय, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. राजच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

