(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या जामदा खोऱ्यातील मध्यवर्ती आणि आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जवळेथर गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सुरेश सिताराम मोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. २७ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी एकमताने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
जवळेथरच्या सामाजिक, राजकीय आणि सार्वजनिक जीवनात सुरेश मोरे यांचे दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान राहिले आहे. त्यांनी गावचे पाच वर्षे सरपंच, तर तब्बल दहा वर्षे उपसरपंच म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या सुख-दुःखात धावून जाणारे आणि ग्रामस्थांच्या अडचणींमध्ये नेहमीच आधार देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची परिसरात ओळख आहे. त्यामुळे तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी झालेली त्यांची निवड ही ग्रामस्थांनी त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाची पावती मानली जात आहे.
सुरेश मोरे यांनी गांगो रवळनाथ नवरात्रोत्सव मंडळ तसेच गांगो रवळनाथ क्रीडा मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली आहे. जवळेथरचा नवरात्रोत्सव हा राजापूर तालुक्यातील आगळावेगळा आणि उत्साहपूर्ण उत्सव म्हणून ओळखला जातो. या उत्सवाच्या माध्यमातून विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमांना दिशा देण्यात सुरेश मोरे यांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण राहिले आहे.
तसेच जवळेथर गणेश मित्र मंडळ, रजि. या मंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. जामदाखोऱ्यातील नामवंत शेतकरी म्हणूनही त्यांची ओळख असून, सामाजिक बांधिलकी, दातृत्व आणि समाजसेवेच्या माध्यमातून त्यांनी ग्रामस्थांमध्ये आपले विशेष स्थान निर्माण केले आहे.
त्यांच्या पत्नी सौ. सिद्धाली सुरेश मोरे यांनी पंचायत समिती सदस्य म्हणून जबाबदारी सांभाळली असून, सध्या त्या तळवडे प्रभागाच्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत आहेत. या कुटुंबाची सामाजिक बांधिलकी आणि समाजोपयोगी कार्याची परंपरा परिसरात परिचित आहे.
तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर गावातील विविध प्रश्न सामंजस्याने सोडविणे, ग्रामस्थांमध्ये सलोखा राखणे आणि गावातील शांततामय वातावरण अधिक बळकट करण्यासाठी सुरेश मोरे यांच्या प्रदीर्घ सामाजिक व प्रशासकीय अनुभवाचा निश्चितच उपयोग होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
सुरेश सिताराम मोरे यांची तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाल्याबद्दल जवळेथर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

