(मुंबई)
महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, समीर कुलकर्णी आणि सुधाकर चतुर्वेदी या सातही आरोपींची अखेर सुटका करण्यात आली आहे.
तब्बल १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार, पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. हा स्फोट २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावच्या भिक्कू चौकात झाला होता. या भीषण घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला तर १०१ जण जखमी झाले होते.
न्यायालयाने म्हटलं की, बाईकमध्ये बॉम्ब ठेवल्याचा ठोस पुरावा उपलब्ध नाही तसेच आरोपींचा दहशतवादी कटात सहभाग असल्याचं सिद्ध होत नाही. या खटल्यात एक लाखांहून अधिक पानांचे दस्तऐवज तपासल्यानंतर हा निर्णय देण्यात आला.
कोर्टाने काही महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली:
- स्फोट झाला हे सिद्ध झाले, मात्र तो मोटरसायकलमध्येच झाला हे सिद्ध झालेलं नाही.
- साध्वी प्रज्ञासिंह यांच्या बाईकचा चेसी क्रमांक स्पष्ट नव्हता; त्यामुळे ती बाईक त्यांची होती हे सिद्ध झालं नाही.
- त्या गाडीवर बोटांचे ठसे आढळले नाहीत.
- प्रसाद पुरोहितने आरडीएक्स आणल्याचा कोणताही पुरावा नाही.
- आरोपींमध्ये बैठका झाल्याचा पुरावा नाही, त्यामुळे कट रचला गेला हे सिद्ध होत नाही.
याशिवाय, मकोका आधी लावला गेला होता, पण नंतर रद्द झाला, त्यामुळे त्याअंतर्गत घेतलेल्या साक्ष निरर्थक ठरल्या. तसेच UAPA साठी घेतलेली मान्यता चुकीची असल्याने तो कायदा लागू होत नाही, असेही कोर्टाने स्पष्ट केले. न्यायालयाने स्पष्ट केलं की, “केवळ संशयाच्या आधारे आरोपींना दोषी ठरवता येणार नाही.”
मालेगावमध्ये त्या दिवशी रमजानचा महिना सुरू होता. रात्री ९:३५ वाजता मशिदीजवळ मोटरसायकलवर स्फोट झाला. या भीषण स्फोटामुळे परिसरातील घरे आणि दुकाने उद्ध्वस्त झाली होती.