(पुणे)
पुण्यातील एका व्यावसायिकाला दोन लाख रुपयांच्या जादा नफ्याचे आमिष दाखवून कल्याण येथे बोलावून भरदिवसा ५ लाख रुपयांची लूट केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नोटा बदलून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश कोळसेवाडी पोलीस यांनी केला असून या प्रकरणात एकूण ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.
पुण्यातील वाघोली परिसरात राहणारे दीपक शिंदे हे इस्टेट एजंट म्हणून काम करतात. काही दिवसांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधून आकर्षक पण संशयास्पद ऑफर दिली. ५ लाख रुपये ५०० रुपयांच्या नोटांत दिल्यास, बदल्यात १०, ५० आणि १०० रुपयांच्या नोटांत ७ लाख रुपये देण्याचे आमिष दाखवण्यात आले. या व्यवहारातून थेट २ लाख रुपयांचा नफा मिळणार असल्याने शिंदे या जाळ्यात अडकले.
ठरल्याप्रमाणे शिंदे ५ लाख रुपये घेऊन कल्याणमधील विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन परिसरात पोहोचले. संबंधित व्यक्तीशी चर्चा सुरू असतानाच अचानक एक स्कार्पिओ गाडी तेथे आली. गाडीतून उतरलेल्या ३ ते ४ जणांनी स्वतःला पोलीस असल्याचे भासवले. ‘इथे काय चाललं आहे?’ अशी विचारणा करत त्यांनी शिंदे यांना गाडीत बसण्यास सांगितले. दरम्यान त्यांच्या हातातील ५ लाख रुपयांची बॅग हिसकावून घटनास्थळावरून पळ काढला.
आपण लुटले गेल्याचे लक्षात येताच शिंदे यांनी तात्काळ कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी वेगाने तपास सुरू करत स्कार्पिओ गाडी पुण्याच्या दिशेने निघाल्याची माहिती मिळवली. त्यानंतर सोमाटणे फाटा टोलनाक्यावर सापळा रचून वाहन अडवण्यात आले. याठिकाणी संजय भोसले, गौशपाक शेख, सोमीनाथ गायकवाड आणि अरविंद जोजट या चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
सखोल चौकशीत उर्वरित साथीदारांची नावे समोर आल्यानंतर पोलिसांनी उल्हासनगर परिसरातून उमाशंकर पांडे, शरद मोहन, नरेश शर्मा आणि लक्ष्मण उर्फ प्रदीप धनवे या आणखी चार आरोपींना अटक केली. या आठही आरोपींनी मिळून तोतया पोलीस बनत लुटीचा कट रचल्याचे स्पष्ट झाले आहे.
या टोळीने याआधीही अशाच प्रकारे किती नागरिकांना फसवले आहे, याचा तपास पोलीस करत असून नागरिकांनी अशा कोणत्याही अवैध आणि आकर्षक आर्थिक आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन कोळसेवाडी पोलिसांकडून करण्यात आले आहे.

