(पुणे / वाघोली)
पुण्यातील वाघोली येथे पार पडलेल्या 68 व्या वरिष्ठ महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा 4-3 असा पराभव करत मानाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. अटीतटीच्या या अंतिम सामन्याने कुस्तीप्रेमींना अक्षरशः खिळवून ठेवले.
रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांच्या आयोजनाखाली झालेल्या या स्पर्धेत राज्यभरातील नामांकित पैलवान सहभागी झाले होते. विशेष म्हणजे यंदा प्रथमच 5 महाराष्ट्र केसरी विजेते स्पर्धेत उतरले होते.
अंतिम लढतीत पहिल्या फेरीत दोन्ही पैलवानांनी एक-एक गुण घेत सावध खेळ केला. मात्र दुसऱ्या फेरीत हर्षवर्धन सदगीरने आक्रमक खेळ करत निर्णायक आघाडी घेतली आणि अखेर 4-3 ने विजय मिळवला. यासह त्याने दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी किताबावर आपले नाव कोरले. महेंद्र गायकवाड यानेही दमदार कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले. तो तिसऱ्यांदा उपमहाराष्ट्र केसरी ठरला.
स्पर्धेतील विजेत्या हर्षवर्धन सदगीरला मंत्री दादा भुसे आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते मानाची गदा, 5 लाख रुपयांचे पारितोषिक आणि फॉर्च्युनर कार देऊन गौरविण्यात आले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी विजेता हर्षवर्धन सदगीर आणि उपविजेता महेंद्र गायकवाड यांचे अभिनंदन करत या अंतिम लढतीला “कुस्ती परंपरेचा मान उंचावणारी” अशी उपमा दिली. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील कुस्ती परंपरा ही समृद्ध असून तरुण पैलवान ती पुढे नेत आहेत, ही अभिमानाची बाब आहे.
माती विभाग निकाल
- 57 किलो: मृणाल पाटील (प्रथम)
- 61 किलो: अमोल वालगुडे (प्रथम)
- 65 किलो: शनिराज निंबाळकर (प्रथम)
- 70 किलो: तुशांत देशमुख (प्रथम)
- 74 किलो: तेजस गोफणे (प्रथम)
- 79 किलो: बिरुदेव बनसोडे (प्रथम)
- 86 किलो: मशीद शेख (प्रथम)
- 92 किलो: श्रीनाथ गोरे (प्रथम)
- 97 किलो: रोहन पवार (प्रथम)
महाराष्ट्र केसरी (माती गट):
- महेंद्र गायकवाड (प्रथम)
गादी विभाग निकाल
- 57 किलो: अक्षय ढेरे (प्रथम)
- 61 किलो: वैभव पाटील (प्रथम)
- 65 किलो: ज्योतिबा अटकळे (प्रथम)
- 70 किलो: सुमितकुमार बारस्कर (प्रथम)
- 74 किलो: आदर्श पाटील (प्रथम)
- 79 किलो: विकास करे (प्रथम)
- 86 किलो: अभिषेक कापडे (प्रथम)
- 92 किलो: श्रेयस गाट (प्रथम)
- 97 किलो: मोहन पाटील (प्रथम)
महाराष्ट्र केसरी (गादी गट):
- हर्षवर्धन सदगीर (प्रथम)

