(देवळे / प्रकाश चाळके)
मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे आयोजित ५८व्या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवाच्या बक्षीस वितरण समारंभासह ५९व्या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात रांगोळी कलाकार विलास विजय रहाटे यांचा सुप्रसिद्ध अभिनेते बोमन इराणी यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. मुंबई विद्यापीठाच्या फाईन आर्ट टीमला इंद्रधनुष्य महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवा महोत्सव, पश्चिम विभाग आंतरविद्यापीठ युवा महोत्सव तसेच राष्ट्रीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सवातील स्पर्धांसाठी सलग चौथ्या वर्षी मार्गदर्शन करून उल्लेखनीय यश मिळवून दिल्याबद्दल हा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अभिनेते बोमन इराणी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) रवींद्र कुलकर्णी यांनी भूषवले. यावेळी मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्राचार्य (डॉ.) अजय भामरे आणि कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सोहळ्यासाठी विलास रहाटे यांनी बोमन इराणी यांची हुबेहूब रांगोळी साकारली होती. ही रांगोळी पाहताच बोमन इराणी यांनी ‘एक्सलंट’ अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली. रांगोळीचे बारकाईने निरीक्षण करत त्यांनी विलास रहाटे यांच्याशी संवाद साधला. ही रांगोळी घरी घेऊन जाता आली असती, तर आपण ती नक्कीच घरी घेऊन गेलो असतो, अशी कौतुकाची भावना बोमन इराणी यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी विलास रहाटे यांच्याकडून रांगोळी कलेतील विविध बारकावेही जाणून घेतले.
विलास रहाटे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई विद्यापीठाच्या विविध कार्यक्रमांमध्ये अनेक दिग्गज व्यक्तींच्या हुबेहूब रांगोळ्या साकारल्या आहेत. यामध्ये अभिनेते, राजकारणी, खेळाडू, उद्योगपती, राज्यपाल, राज्यातील व केंद्रातील मंत्री, विविध क्षेत्रांतील कलाकार, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि अवकाशवीर यांचा समावेश आहे. त्यांच्या या कलाकृतींना विविध मान्यवरांकडून सातत्याने दाद मिळत आहे.
विद्यार्थीदशेत विलास रहाटे यांनी मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या संघाचे तीन वेळा प्रतिनिधित्व केले होते. गेल्या चार वर्षांपासून ते मुंबई विद्यापीठाच्या फाईन आर्ट टीमची धुरा सांभाळत असून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या या कार्याला मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील आणि मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक निलेश सावे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

