(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा तळवडी गावातील रस्ता राष्ट्रीय महामार्गाला दोन्ही बाजूंनी जोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गावातील वाहतुकीचा मार्ग एका बाजूने महामार्गाला जोडण्यात आला असून दुसऱ्या बाजूचा मार्ग बंद करण्यात आल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य बापू शेट्ये यांनी आमदार किरण सामंत यांची भेट घेऊन ग्रामस्थांच्या समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.
तळवडी गावातील पोलीस ठाणे, ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा, रेशन दुकान तसेच बाजारपेठ या प्रमुख ठिकाणी ये-जा करण्यासाठी ग्रामस्थांना या रस्त्याचा वापर करावा लागतो. मात्र राष्ट्रीय महामार्गाला एका बाजूनेच जोडणी असल्याने नागरिकांना मोठा वळसा घालावा लागत होता. त्यामुळे गावातील वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता.
या समस्येबाबत शिवसेना कार्यकर्ते ओंकार कोलते, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने आमदार किरण सामंत यांच्याकडे तळवडीतील रस्ता महामार्गाला दोन्ही बाजूंनी जोडण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य बापू शेट्ये यांनी आमदार सामंत यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ग्रामस्थांच्या अडचणी सविस्तरपणे मांडल्या.
ग्रामस्थांची समस्या समजताच आमदार किरण सामंत यांनी तातडीने संबंधित महामार्ग कंपनी रवी इन्फ्राच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. तळवडीतील रस्ता महामार्गाला दोन्ही बाजूंनी जोडण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच, कामासाठी काही बाबी कमी पडत असतील तर त्या उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवत रस्ता पक्का आणि योग्य पद्धतीने पूर्ण झाला पाहिजे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
दरम्यान, तळवडीतील रस्ता लवकरच राष्ट्रीय महामार्गाला दोन्ही बाजूंनी जोडण्यात येईल, अशी माहिती रवी इन्फ्रा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे गेल्या काही काळापासून वाहतुकीच्या समस्येला सामोरे जाणाऱ्या तळवडी ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

