(दापोली / प्रतिनिधी)
पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका तरुणाला आठ जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना तालुक्यातील केळशी मोहल्ला परिसरात घडली. तरुणाला वाचवण्यासाठी धावून आलेल्या त्याच्या मित्रांसह आई आणि मेहुण्यालाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केळशी येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेजवळ २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ४.४० वाजता ही घटना घडली. याप्रकरणी रिजवान दाऊद अलबा (३२, व्यवसाय मच्छीमारी, रा. नबी मोहल्ला, केळशी) यांनी दापोली पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून रियाज अली बोरकर याच्यासह कबीर इलियास चाऊस, अली इलियास चाऊस, समीउल्ला फराज चाऊस, इलियास अली चाऊस, फईम इलियास चाऊस, जमशीद इलियास चाऊस आणि वहीद आशिफ खमसे यांनी रिजवान अलबा यांच्याशी वाद घालत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी रियाज बोरकर याने रिजवान यांच्या डाव्या डोळ्यावर ठोसा मारल्याने दुखापत झाली. त्यानंतर इतरांनी त्यांना जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच रियाज बोरकर याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
रिजवान यांना मारहाण होत असल्याचे पाहून त्यांचे मित्र अबरार इस्माईल डायली, रियान इकबाल चाऊस, नाजीम इकबाल डायली तसेच आई हमीदा दाऊद अलबा आणि मेहुणे मसूद शरीफ बोरकर यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेत मसूद शरीफ बोरकर यांच्या उजव्या गालाला दुखापत झाली.
या प्रकरणी २७ ऑगस्ट रोजी दुपारी २.३९ वाजता दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७१/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलमे १८९(२), १९०, १११(२) तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ मधील कलम ३७(१)(३)/१३५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास दापोली पोलिस करीत आहेत.

