(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील वरवडे ग्रामपंचायतीअंतर्गत महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्षपदी कुलदीप अनंत जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे वरवडे बौद्धवाडीला प्रथमच तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला आहे.
कुलदीप जाधव हे वरवडे बौद्धवाडी येथील बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक ३० चे विद्यमान अध्यक्ष असून, वाटद-खंडाळा दीक्षाभूमी येथील बावीस खेडी बौद्धजन संघाचे चिटणीस म्हणूनही ते कार्यरत आहेत. क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय सहभाग घेणारे क्रियाशील युवा नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.
वरवडे ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाचा बहुमान प्रथमच बौद्धवाडीला मिळाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे. या निवडीबद्दल वरवडे बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक ३०, आदर्श महिला मंडळ, न्यू भीमस्टार मंडळ तसेच वाडीतील विद्यार्थ्यांच्या वतीने कुलदीप जाधव यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
तंटामुक्त समितीच्या माध्यमातून गावातील सामाजिक सलोखा, शांतता आणि आपसी सौहार्द अधिक दृढ करण्यासाठी आपण प्रभावीपणे काम करू, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. त्यांच्या निवडीबद्दल वरवडे ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील विविध संस्था आणि संघटनांच्या वतीने कुलदीप जाधव यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

