( दापोली / वार्ताहर )
समग्र शिक्षा अंतर्गत ग्रंथालय उपक्रमाच्या माध्यमातून इयत्ता ६ वी ते ८ वीच्या शिक्षकांसाठी आयोजित पुस्तक लेखन स्पर्धेत दापोली तालुक्यातील कोळबांद्रे केंद्रातील जि.प. शाळा कोळबांद्रे नं. १ येथील उपशिक्षिका श्रीमती चेतना बाळाराम केतकर यांच्या ‘उमलती मने’ या पुस्तकाने जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशानंतर पुस्तकाची आता राज्यस्तरीय मूल्यमापनासाठी निवड झाली आहे.
‘कोवळ्या मनांच्या अंतरंगातील हळवे पदर’ या उपशीर्षकातून किशोरवयीन मुलांच्या भावविश्वाचा संवेदनशील वेध घेणारे ‘उमलती मने’ हे पुस्तक बालमनातील विविध पैलू, समस्या, संवेदना आणि भावनिक घडामोडी प्रभावीपणे मांडते. अध्यापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये चेतना आणि प्रेरणा निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या श्रीमती केतकर यांच्या लेखणीला मिळालेले हे यश शैक्षणिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय ठरले आहे.
श्रीमती चेतना केतकर गेल्या ११ वर्षांपासून दापोली तालुक्यात प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यापूर्वी त्यांनी परभणी जिल्ह्यात ४ वर्षे आणि रायगड जिल्ह्यात ४ वर्षे शैक्षणिक क्षेत्रात सेवा बजावली आहे. या प्रदीर्घ शैक्षणिक प्रवासात बालमानसशास्त्राचा अभ्यासक म्हणून किशोरवयीन मुलांच्या विविध समस्या समजून घेण्याची तसेच त्यावर काम करण्याची संधी त्यांना मिळाली.
किशोरवयीन मुलांच्या मनातील भावविश्व, त्यांच्या समस्या, संवेदना आणि भावनिक घडामोडी लेखरूपाने मांडण्याची इच्छा गेल्या अनेक वर्षांपासून मनात होती. समग्र शिक्षा अंतर्गत राबविण्यात आलेल्या ग्रंथालय पुस्तक निर्मिती उपक्रमामुळे ही इच्छा प्रत्यक्षात साकार झाली, असे श्रीमती केतकर यांनी सांगितले.
दैनंदिन शैक्षणिक धावपळीत लिहायचे राहून गेलेले विचार ‘उमलती मने’च्या माध्यमातून वाचकांसमोर मांडता आले. पुस्तक निर्मितीच्या प्रक्रियेत स्वनिर्मिती आणि नवनिर्मितीचा आनंद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. पुस्तकाच्या आशयाला साजेशी रूपकचित्रे, छपाईतील बारकावे आणि पुस्तकाची बांधणी यांसारख्या विविध बाबींचा प्रत्यक्ष अनुभव घेताना नवीन माहिती मिळाली. या प्रक्रियेदरम्यान क्षेत्रातील विविध मान्यवरांशी परिचय झाल्याने अनुभवसंपन्नताही वाढल्याचे त्यांनी नमूद केले.
शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय लेखनाची दखल घेत ‘उमलती मने’ या पुस्तकाची राज्यस्तरीय मूल्यमापनासाठी निवड झाल्याबद्दल श्रीमती चेतना केतकर यांचे शिक्षण विभाग, शिक्षकवर्ग, पालक तसेच विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.


