( खेड / वार्ताहर )
मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात आज (गुरुवारी) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास अल्टो कार आणि एन्जॉय गाडी यांच्यात भीषण समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांतील दोन जण जखमी झाले असून त्यांना तातडीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमी चिपळूण सावर्डे येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाड येथून सावर्डेच्या दिशेने जाणारी अल्टो कार भोस्ते घाटात विरुद्ध दिशेने जात होती. याचवेळी चिपळूणहून दापोलीकडे जाणाऱ्या एन्जॉय गाडीशी तिची जोरदार धडक झाली. विशेष म्हणजे, या घाटात एकदिशा वाहतूक व्यवस्था लागू असतानाही दोन वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने या मार्गावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
अपघाताची माहिती मिळताच मदत ग्रुप खेडचे अध्यक्ष प्रसाद गांधी यांनी स्वतःची रुग्णवाहिका घेऊन तातडीने घटनास्थळ गाठले. प्रसाद गांधी आणि आनंद घोले यांनी अपघातातील दोन्ही जखमींना कोणताही विलंब न करता रुग्णवाहिकेतून कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात पोहोचवले.
अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रसाद गांधी आणि आनंद घोले यांनी दाखवलेल्या तत्परतेचे कौतुक होत आहे. भोस्ते घाटात एकदिशा वाहतुकीची व्यवस्था असतानाही विरुद्ध दिशेने वाहन येण्यामुळे अशा प्रकारचे अपघात घडत असल्याने वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.


