(दापोली)
शांततेसाठी ओळखल्या जाणाऱ्या दापोली शहरात शनिवारी मध्यरात्री घडलेल्या अनपेक्षित घटनेने नागरिकांत एकच खळबळ उडाली. एका नेपाळी तरुणाने अचानक संतापाच्या भरात रस्त्यावर उतरून तब्बल पाच ते सहा चारचाकी आणि सहा दुचाकी वाहनांची तोडफोड केली. या घटनेमुळे शहरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.
सदर नेपाळी तरुण गेल्या तीन महिन्यांपासून दापोलीतील एका हॉटेलमध्ये काम करत होता. मात्र, शनिवारी रात्री तो काही कारणाने अचानक संतप्त अवस्थेत बाहेर पडला आणि रस्त्यावर उभ्या वाहनांवर दगडफेक व तोडफोड सुरू केली. काही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, परिसरात आरडाओरड आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्या तरुणाला ताब्यात घेतले.
पोलिसांनी वाहनमालकांचे जबाब नोंदवून पंचनामा केला असून, या तरुणाविरोधात तोडफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत सदर तरुण मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

