(रत्नागिरी /दापोली प्रतिनिधी)
मानवी आरोग्यास घातक ठरणाऱ्या प्रतिबंधित पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने दापोली तालुक्यात मोठी कारवाई केली आहे. गिम्हवणे येथील एका दुकानातून प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून, संबंधित दुकानदाराविरोधात विविध कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई १८ मे रोजी दुपारी गिम्हवणे येथील जिल्हा परिषद शाळेजवळ असलेल्या ‘श्री स्टोअर्स’ येथे करण्यात आली. याप्रकरणी रत्नागिरी येथील अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संकेत शंकरराव कोणेरी (वय २७) यांनी फिर्याद दिली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने केलेल्या तपासणीदरम्यान दुकानात विक्रीसाठी साठवून ठेवलेले विविध प्रकारचे प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. यात विमल पान मसाला, रजनीगंधा, आरएमडी पान मसाला तसेच सुगंधित तंबाखूचे पाऊच आणि पॅक यांचा समावेश असून, एकूण ७ हजार ३२२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासादरम्यान संबंधित आरोपी समीर दामोदर महाडिक (वय ५२, रा. गिम्हवणे, ता. दापोली) यांच्याकडे सदर माल कोठून आणि कोणाकडून खरेदी करण्यात आला, याबाबत विचारणा करण्यात आली. मात्र त्यांनी यासंदर्भातील कोणताही वैध तपशील सादर केला नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ तसेच महाराष्ट्र अन्न सुरक्षा आयुक्तांच्या आदेशानुसार अशा प्रकारचे प्रतिबंधित अन्नपदार्थ मानवी आरोग्यास अत्यंत घातक मानले जातात. या पदार्थांच्या सेवनामुळे गंभीर शारीरिक परिणाम होण्याबरोबरच भावी पिढीच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो, असे व्यापक वैज्ञानिक निष्कर्षांवरून स्पष्ट झाले असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
याप्रकरणी आरोपीविरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

