(रत्नागिरी / प्रतिनिधी)
पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाल्याची घटना रत्नागिरी शहराजवळील मिरजोळे येथील पाडावेवाडी परिसरात घडली. मंडप डेकोरेटरला मारहाण केल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी धावून आलेल्या पत्नीवरही दांडक्याने हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार एलिगन्सी, पाडावेवाडी, मिरजोळे येथील इमारतीच्या पार्किंगखाली २६ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी विजय भिकाजी शिर्के (४९, व्यवसाय मंडप डेकोरेटर, रा. पाडावेवाडी, मिरजोळे) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, राजा गाडेकर याने विजय शिर्के यांना पवार एलिगन्सीच्या पार्किंगखाली बोलावून घेतले. तेथे काळी दाढी असलेला, चॉकलेरी रंगाचा शर्ट व काळी ट्रॅक पॅन्ट परिधान केलेल्या व्यक्तीने रोहन गाडेकर याच्याकडून घेतलेले पैसे परत न केल्याच्या कारणावरून शिर्के यांच्याशी वाद घातला. त्यानंतर त्यांच्या डाव्या पायावर गुडघ्याखाली तसेच उजव्या पायाच्या पोटरीखाली मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. दरम्यान, पतीला मारहाण होत असल्याचे समजताच शिर्के यांच्या पत्नी घटनास्थळी धावून आल्या. त्यावेळी त्यांच्यावरही दांडक्याने डोक्यात प्रहार करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. याशिवाय संबंधित व्यक्तींनी शिवीगाळ करत दोघांनाही ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेप्रकरणी २७ ऑगस्ट रोजी पहाटे २.१० वाजता रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९१/२०२६ दाखल करण्यात आला. भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम ११८(१), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस नोंदीनुसार, प्रकरणातील आरोपींपैकी दोघांची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. पैशांच्या व्यवहारातून सुरू झालेल्या वादाने मारहाणीचे गंभीर स्वरूप धारण केल्याने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

