(दापोली)
तालुक्यातील रोवले उंबरशेत ते मांदिवली मार्गावर आज (१३ रोजी) पुन्हा एकदा बॉक्साइटने भरलेल्या डम्परचा अपघात झाल्याची घटना घडली. अपघात ज्या ठिकाणी झाला त्या भागातील रस्ता पूर्णपणे मोकळा आणि सरळ असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोणताही अडथळा नसताना डम्पर आडवा पडणे सहज शक्य नसून, अतिवेग किंवा ओव्हरलोडिंगमुळे चालकाचा ताबा सुटल्यानेच असा अपघात झाला असावा, असा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे.
ओव्हरलोड डम्पर वाहतुकीमुळे धोका वाढतोय
या मार्गावरून ओव्हरलोड डम्पर सातत्याने भरधाव वेगाने ये-जा करत असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून वारंवार केल्या जात आहेत. याआधीही या परिसरात अपघात घडले असून, तरीही संबंधित यंत्रणांकडून ठोस कारवाई होत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
सदर अपघाताची पुनरावृत्ती लक्षात घेता, बॉक्साइट वाहतुकीवर नियंत्रण, वेगमर्यादा पाळण्याची सक्ती आणि ओव्हरलोड वाहनांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संबंधित प्रशासनाने गंभीर दखल घेऊन तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

