(रत्नागिरी /प्रतिनिधी)
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने पुन्हा एकदा आपल्या कौशल्याची चुणूक दाखवत एका गंभीर रुग्णाचे प्राण वाचवले आहेत. तीन-चार महिन्यांपासून पोटदुखी आणि शौचास अडचण होत असल्याने मृत्यूशी झुंज देणाऱ्या ६५ वर्षीय नेपाळी आजीबाईंवर शस्त्रक्रिया विभागाचे डॉ. मनोहर कदम यांनी अत्यंत किचकट आणि आव्हानात्मक आपत्कालीन शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. तब्बल ८५ ते ९५ सेंटीमीटरपर्यंत काळे पडून मृत झालेले आतडे कापून काढत डॉ. कदम यांनी या आजीबाईंना नवे जीवनदान दिले आहे.
थापा (वय ६५) असे या रुग्णाचे नाव असून, गेल्या तीन ते चार महिन्यांपासून त्या असह्य पोटदुखीने त्रस्त होत्या. यापूर्वी त्यांनी भारतात तसेच नेपाळमधील विविध नामांकित रुग्णालयांत उपचार घेतले होते. मात्र, औषधोपचारांमुळे तात्पुरता आराम मिळण्यापलीकडे त्यांच्या आजाराचे मूळ निदान झाले नव्हते. सहा महिन्यांपूर्वी त्यांची अपेंडिक्सची शस्त्रक्रिया झाली होती आणि तेव्हापासून हा त्रास बळावला होता. अखेर २५ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास अत्यंत गंभीर आणि वेदनादायी अवस्थेत त्यांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाच्या अपघात विभागात (कॅज्युअल्टी) दाखल करण्यात आले.
रुग्णाची नाजूक प्रकृती पाहून डॉ. मनोहर कदम यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने तपासणी करून रात्री साडेआठ वाजता आपत्कालीन शस्त्रक्रिया करण्याचा धाडसी निर्णय घेतला. शस्त्रक्रियेदरम्यान धक्कादायक बाब समोर आली. जुन्या अपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेच्या ठिकाणी लहान आतडे चिकटून बसले होते आणि त्यात गुंता होऊन आतड्याला छिद्र पडले होते. रक्तपुरवठा खंडित झाल्याने जठरापासून खालचा व मोठ्या आतड्याला जोडणारा सुमारे ८५ ते ९५ सेंमीचा भाग पूर्णपणे काळा पडून सडला (मृत झाला) होता. केवळ शेवटचे १० सेंमी आतडे सुस्थितीत होते. डॉ. कदम यांनी अत्यंत कौशल्याने हा संपूर्ण मृत भाग कापून काढला आणि निरोगी आतडे यशस्वीरीत्या जोडून दिले. या शस्त्रक्रियेत डॉ. कदम यांना सहाय्यक शल्यचिकित्सक डॉ. श्वेता, डॉ. साक्षी, भूलतज्ज्ञ डॉ. जमशीर आणि परिचारिका रुपाली यांची मोलाची साथ लाभली आहे. सध्या या आजीबाईंना अतिदक्षता विभागात (आयसीयू) ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. शासकीय रुग्णालयातील या तत्पर आणि दर्जेदार वैद्यकीय सेवेबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
रुग्ण पूर्णपणे बरी झाल्याशिवाय घरी सोडणार नाही : डॉ. कदम
या शस्त्रक्रियेबद्दल बोलताना डॉ. मनोहर कदम म्हणाले की, “रुग्णाची स्थिती अत्यंत गंभीर होती. वेळेत अचूक निदान करून तातडीने शस्त्रक्रिया केल्याने त्यांचा जीव वाचवता आला. यापूर्वी डहाणू आणि जुनागड येथे कार्यरत असताना मी अशा अनेक आव्हानात्मक शस्त्रक्रिया केल्या आहेत. अधिष्ठाता डॉ. रामानंद आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. सांगवीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालयात अशा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी होत आहेत. या आजीबाईंना सामान्य कक्षात हलवल्यानंतर त्या पूर्णपणे ठणठणीत बऱ्या होत नाहीत, तोपर्यंत त्यांना घरी सोडणार नाही.”


