(रत्नागिरी /प्रतिनिधी)
आरोग्यास अपायकारक आणि राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या गुटखा व पान मसाला विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने रत्नागिरीतील कुवारबाव येथे धडक कारवाई करत सुमारे १३ हजार ५६७ रुपये किमतीचा ‘विमल’ पान मसाला जप्त केला. या कारवाईमुळे प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्रीवर प्रशासनाने पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ जून रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास कुवारबाव बाजारपेठेतील भराडीन जनरल स्टोअर्स येथे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने तपासणी केली. या वेळी दुकानात विक्रीसाठी साठवून ठेवलेला प्रतिबंधित ‘विमल’ पान मसाल्याचा मोठा साठा आढळून आला. तपासणीत एकूण ७१ पॅकेट्स आणि ९५ पाउच असा सुमारे १३,५६७ रुपयांचा माल जप्त करण्यात आला. राज्यात विक्री, साठवणूक व वितरणास बंदी असलेल्या या पान मसाल्याचा साठा विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संबंधितांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे कर्मचारी ज्ञानेश्वर आटपाडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाईचा बडगा उगारला असून, अशा प्रकारच्या बेकायदा व्यापाराविरोधातील मोहिम आगामी काळातही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

