(रत्नागिरी)
शहरानजीकच्या मिरजोळे एमआयडीसी परिसरात असलेल्या ड्राय फिश प्रक्रिया कंपनीत कार्यरत असलेल्या परराज्यातील कामगाराचा उपचारादरम्यान आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना मंगळवार, 3 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.
राजू सोरेन (वय 41, मूळ रा. ट्रवारा आयनो सोरेन होरोटोला, पटकीजुली वस्म, आसाम) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. या घटनेची माहिती कंपनीचे मालक मोहम्मद हुसेन रफिक मंगा यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली आहे.
मिरजोळे एमआयडीसी येथे असलेल्या मंगा यांच्या ड्राय फिश प्रक्रिया करणाऱ्या कंपनीत आसाम राज्यातील आठ कामगार काम करत आहेत. सोमवारी, 2 फेब्रुवारी रोजी काम सुरू असताना राजू सोरेन यांच्या पोटात अचानक तीव्र वेदना सुरू झाल्या. प्रकृती खालावल्याने त्यांना रात्री सुमारे 8 वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मंगळवार, 3 फेब्रुवारी रोजी दुपारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

