(रत्नागिरी /प्रतिनिधी)
दोन महाराष्ट्र नेवल युनिट एनसीसी, रत्नागिरीतर्फे आयोजित वार्षिक प्रशिक्षण शिबिरास उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला आहे. शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयात २९ एप्रिल ते ८ मे या कालावधीत पार पडणाऱ्या या शिबिरात रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील एकूण २८८ कॅडेट्स सहभागी झाले आहेत.
या शिबिरात तीन एनसीसी अधिकारी, एक गर्ल्स कॅडेट इन्स्ट्रक्टर, आठ नेव्ही ऑफिसर स्टाफ तसेच आठ राज्य शासकीय कर्मचारी सहभागी असून, कॅम्प कमांडर रामंजून दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे.
शिबिरादरम्यान कॅडेट्समध्ये शिस्त, देशप्रेम, समानता, जिद्द आणि ध्येयवादी वृत्ती रुजविण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. त्यासाठी विविध शारीरिक, बौद्धिक आणि प्रात्यक्षिक प्रशिक्षणांसह उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे. या प्रशिक्षण शिबिरातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासास चालना मिळणार असून, भावी काळात सक्षम आणि जबाबदार नागरिक घडविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

