(संगमेश्वर /प्रतिनिधी)
दारूच्या व्यसनावरून सख्ख्या भावांमध्ये झालेल्या शाब्दिक वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. दारू पिऊन घरी आलेल्या भावाला ‘रोज दारू पिऊन घरी येतोस, घरातील काम करत नाहीस, घराकडे लक्ष देत नाहीस,’ असे सुनावल्याने दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर संतापलेल्या भावाने शिवीगाळ करत थापटाने मारहाण केली. एवढ्यावर न थांबता घरातील कांदा कापण्याच्या लहान सुरीने पोटावर आणि डाव्या मनगटावर वार करून जखमी केल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील मेघी फौजदारवाडी येथे घडली.
याप्रकरणी दिपक बाबी करंबेळे (४८) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचा सख्खा भाऊ दशरथ बाबी करंबेळे (४७, दोघेही रा. मेघी फौजदारवाडी, ता. संगमेश्वर) याच्याविरोधात संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे सख्खे भाऊ असून ते आई-वडिलांसमवेत एकाच घरात राहतात. दोघांनाही दारूचे व्यसन असल्याने त्यांच्या पत्नी त्यांच्यासोबत राहत नसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
२५ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास दिपक करंबेळे हे दारू पिऊन घरी आले. त्यावेळी आरोपी दशरथ याने त्यांना दारूच्या व्यसनावरून जाब विचारला. ‘तू रोज दारू पिऊन घरी येतोस, घरातील कोणतेही काम करत नाहीस आणि घराकडे लक्ष देत नाहीस,’ असे त्याने सुनावले. यावरून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. वाद वाढल्यानंतर दशरथ याने दिपक यांना शिवीगाळ करत हाताच्या थापटाने मारहाण केली. त्यानंतर घरातील कांदा कापण्याची लहान सुरी हातात घेऊन दिपक यांच्या पोटावर तसेच डाव्या मनगटावर वार केला. या हल्ल्यात दिपक जखमी झाले. त्यानंतर आरोपीने त्यांना ठार मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ११८(१), ११५(२), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीच्या भारतीय दंड संहितेतील कलम ३२४, ३२३, ५०४ आणि ५०६ शी संबंधित तरतुदींनुसार हे कलम नमूद करण्यात आले आहेत. गुन्हा २५ ऑगस्ट रोजी रात्री घडला असून २६ ऑगस्ट रोजी पहाटे ४.०५ वाजता त्याची नोंद करण्यात आली.

