(देवरूख)
देवरूख–भंडारवाडी येथे एस. आर. चॅलेंजर क्रीडा मंडळाच्या वतीने भव्य अशा ‘जय भंडारी चषक’ क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा महोत्सवांतर्गत तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा, सत्कार समारंभ तसेच गुणवंतांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
ही स्पर्धा ८ व ९ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आली असून, तालुक्यातील नामांकित कबड्डी संघांचा सहभाग लाभणार आहे. स्पर्धेत प्रथम क्रमांकास ₹१०,०२६/- व चषक, द्वितीय क्रमांकास ₹७,०२६/- व चषक, तृतीय क्रमांकास ₹३,०२६/- व चषक तसेच चतुर्थ क्रमांकास ₹२,०२६/- व चषक देण्यात येणार आहेत. याशिवाय उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट चढाई व उत्कृष्ट पकड यांसाठीही आकर्षक बक्षिसांची योजना करण्यात आली आहे. स्पर्धेतील सर्व सामन्यांना मानांकन देण्यात येणार असून, सहभागी सर्व संघांना सन्मानचिन्हे प्रदान केली जाणार आहेत.
८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता कबड्डी स्पर्धेचा बक्षीस समारंभ, ६.३० वाजता दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तर ७.०० वाजता ‘जय भंडारी चषक’ कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. तसेच ९ जानेवारी २०२६ रोजी रात्री ९.०० वाजता सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर खेळाडूंचा सत्कार समारंभ व कबड्डी स्पर्धेतील बक्षीस वितरण समारंभ पार पडणार आहे.
या भव्य क्रीडा महोत्सवाला क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक एस. आर. चॅलेंजर क्रीडा मंडळ, देवरूख–भंडारवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन आशिष पुसाळकर, निलेश तळेकर, मयूर पुसाळकर, अभि तळेकर व रोशन भाटकर यांनी केले आहे.

