(चिपळूण /रत्नागिरी प्रतिनिधी)
बोलण्यावरून झालेल्या शाब्दिक वादाचे पर्यवसान मारहाणीत झाल्याची घटना चिपळूण तालुक्यातील कुटरे स्टॉप येथे घडली. एका व्यक्तीला जोरात ढकलून लाथ मारल्यानंतर लाकडी दांडक्याने कानाच्या पाळीवर प्रहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात संतोष बबन होवळे (वय ४७, रा. कुटरे चिंचवाडी, ता. चिपळूण) हे जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, २६ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास कुटरे स्टॉप येथील नाक्यावरील पिकअप शेडजवळ संतोष होवळे हे सचिन साळवी, हेमंत चिनकटे आणि वैभव विजय शिर्के यांच्यासमवेत बसले होते. यावेळी वैभव शिर्के हा तळवडे येथील गुरव हे कुटरेकरांना उद्देशून अपमानास्पद शब्द वापरत असल्याचे सांगत होता. त्यावर संतोष होवळे यांनी संबंधित व्यक्तींना काही सांगायचे होते, तर त्यांना तेथेच विचारायला हवे होते, असे म्हटले. यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. संतोष यांनी आपल्याला काही सांगू नको, असे बजावल्यानंतर संतापलेल्या शिर्के याने त्यांना जोरात ढकलले. त्यानंतर लाथ मारून तेथे पडलेला लाकडी दांडका उचलत डाव्या कानाच्या पाळीवर प्रहार केला. या मारहाणीत होवळे यांच्या कानाला दुखापत होऊन रक्तस्राव सुरू झाला.
यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या हेमंत चिनकटे आणि सचिन साळवी यांनी मध्यस्थी करून होवळे यांची झटापटीतून सुटका केली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांनी विलंबाने पोलिसांत तक्रार दिली. या प्रकरणी वैभव विजय शिर्के (रा. कुटरे खालचे आवाड, ता. चिपळूण) याच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ११८(१) आणि ११५(२) अन्वये सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाब्दिक मतभेदाचे रूपांतर थेट शारीरिक हल्ल्यात झाल्याने सार्वजनिक ठिकाणी वादविवाद करताना संयम राखण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.


