(देवळे / प्रकाश चाळके)
गेल्या दीडशे वर्षांपासून साखरपा पंचक्रोशीत ज्ञानाचा दीप प्रज्वलित ठेवणारी साखरपा नं. १ शाळा आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी कायमच चर्चेत असते. नवोदय विद्यालय व शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते झेंडावंदन असो किंवा पालक-मातांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन असो, शाळा नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत आगळेवेगळे उपक्रम राबवत असते.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी ‘शाळा प्रवेशोत्सवा’निमित्त साखरपा नं. १ शाळेत एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. गेल्या महिन्यात शाळेजवळील जीर्ण झालेला पूल पाडण्यात आला होता. आमदार किरण सामंत यांच्या सहकार्याने तसेच जिल्हा परिषद उपाध्यक्ष व बांधकाम सभापती विलास चाळके यांच्या प्रयत्नांतून त्या ठिकाणी नव्या पुलाची उभारणी करण्यात आली.
नवीन पूल तयार झाला असला तरी त्याचे उद्घाटन बाकी होते. ग्रामपंचायत सदस्य श्री. लक्ष्मण कदम व ठेकेदार श्री. मनोज चव्हाण यांच्या संकल्पनेतून हा पूल इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचे ठरविण्यात आले. कोंडगाव व साखरपा पंचक्रोशीतील मान्यवर, पालक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत पहिलीतील विद्यार्थ्यांनी फीत कापून व श्रीफळ वाढवून पुलाचे उद्घाटन केले. त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी या लहानग्यांचा प्रवेशोत्सव अविस्मरणीय ठरला.
या प्रसंगी कोंडगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ. श्रद्धा शेट्ये, ग्रामपंचायत सदस्या सौ. दीप्ती गांधी, सौ. साक्षी चव्हाण, सौ. नयना शिंदे, केंद्रप्रमुख सौ. दिव्या भाटकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. विनायक शिंदे, उपाध्यक्षा शुभ्रा नारकर, सदस्या स्नेहा बने, राजेश सावंत, नितिन सकपाळ, पत्रकार संतोष पोटफोडे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. सोनवणे तसेच उपशिक्षक श्री. बाबासाहेब लाड आदी मान्यवर उपस्थित होते.
अनोख्या पद्धतीने नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याच्या या उपक्रमाचे पंचक्रोशीत सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

