(संगमेश्वर / प्रतिनिधी)
कोकणातील शेतकऱ्यांच्या संसाराचे अर्थकारण सांभाळण्यात घरातील स्त्रीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. काबाडकष्ट करून पदराच्या गाठीला चार पैसे बांधत शेतकऱ्याची सहचारिणी संसाराचे आर्थिक गणित जुळवत असते. पावसाळ्यात परसदारी पिकवल्या जाणाऱ्या गावठी भाज्या हे या कुटुंबांच्या उत्पन्नाचे एक महत्त्वाचे साधन ठरते. सध्या कोकणातील विविध भागांतील बाजारपेठांमध्ये रानभाज्यांसह परसदारच्या गावठी भाज्या विक्रीसाठी घेऊन महिला बसल्याचे चित्र दिसत आहे.
कोकणातील अनेक घरांमध्ये अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर घराच्या परसदारी विविध गावठी भाज्यांच्या बिया रुजत घातल्या जातात. पडवळ, दोडका, काकडी, कारले, दुधी भोपळा, लाल भोपळा, पारोसे अशा विविध भाज्यांचा त्यामध्ये समावेश असतो. पावसाळा सुरू होईपर्यंत या बियांच्या वाफ्यांना नियमित पाणी दिले जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी रुजवलेल्या बिया उगवल्या की, त्यांच्या वेलींची वाढ सुरू होते आणि शेतकरी कुटुंबाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलते.
या वेलींच्या वाढीवर अनेक कुटुंबांचे पुढील आर्थिक गणित अवलंबून असते. वेली बहरू लागल्या की त्यावर उमलणारी फुले आणि लागणारी फळे शेतकरी कुटुंबासाठी केवळ भाजीपाला नसतो, तर त्यांच्या मेहनतीचे आणि आशेचे प्रतीक असतात. संपूर्ण कुटुंब या वेलींची आपल्या मुलाप्रमाणे काळजी घेत असते. त्यातूनच चांगली फळधारणा होऊन घरच्या परसदारातून भाजी बाजारात दाखल होते.
परसदारच्या भाज्या बाजारात जेवढ्या लवकर दाखल होतील, तेवढा चांगला दर मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकरी कुटुंबाचा या भाज्या लवकर बाजारात आणण्याकडे कल असतो. पावसाळ्यात घराच्या परसदारी पिकणाऱ्या या भाज्यांमागे केवळ श्रम नसतात, तर कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकीही असते. त्यामुळेच या गावठी भाज्यांची चवही वेगळी आणि अवीट असते.
परजिल्ह्यांतून विक्रीसाठी येणाऱ्या भाज्यांच्या तुलनेत कोकणातील परसदारच्या गावठी भाज्यांचे दर अनेकदा तुलनेने कमी असतात. विशेष म्हणजे या भाज्यांच्या लागवडीत प्रामुख्याने सेंद्रिय खतांचा वापर केला जातो. रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर टाळून पिकवलेल्या या भाज्या ग्राहकांच्या पसंतीस उतरतात.
मात्र, बाजारात या भाज्या विक्रीसाठी घेऊन बसलेल्या महिलांच्या मागे असलेले कष्ट ग्राहकांनीही समजून घेणे गरजेचे आहे. काही रुपयांसाठी दर पाडून मागण्यापूर्वी या भाज्या पिकवण्यासाठी घेतलेली मेहनत आणि त्यामागील कुटुंबाची गरज लक्षात घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कारण या भाजीविक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून शेतकरी कुटुंबातील महिलेला आगामी गणेशोत्सवाचे आर्थिक नियोजन करायचे असते.
परसदारात फुललेली ही भाजी म्हणजे कोकणातील ग्रामीण कुटुंबाच्या श्रमाची, मायेची आणि स्वावलंबनाची कहाणी आहे. म्हणूनच या भाज्यांची खरी चव केवळ त्यांच्या ताजेपणात नाही, तर त्या पिकवणाऱ्या हातांच्या अफाट कष्टात आणि अंतर्मनातील प्रेमात दडलेली आहे.
(छाया : सिद्धेश वैद्य, रत्नागिरी)

