येत्या १ डिसेंबर रोजी सकाळी ७.०० वाजता बारा वाड्यांच्या वतीने श्री देव भैरीवर अभिषेक, ८ वाजता सत्यनारायण पूजा प्रारंभ, ८.३० वाजता कालभैरव याग (होम हवन) होईल. ९.३० वाजता दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील (नाचणे) साधक सामूहिक कालभैरव पठण करतील. ११ वाजता आरती मंत्रपुष्प आयोजन केले आहे. दुपारी १२ वाजल्यापासून सायंकाळपर्यंत खिचडी प्रसादाचे वितरणही करण्यात येणार आहे.
जयंतीनिमित्त दुपारी १२ ते १.३० या वेळेत श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ (आंबेशेत, बुवा शुभम सचिन वायंगणकर), दुपारी १.३० ते ३.०० या वेळेत श्री दुर्गामाता भजन मंडळ (कर्ले, बुवा सौ. नेहा शेट्ये) यांचे सुश्राव्य भजन होईल. दुपारी ३ ते ४ या वेळेत हभप प्रविण मुळ्ये कालभैरव जयंतीनिमित्त कीर्तन सादर करतील. सायंकाळी ५ ते ७ या वेळेत श्री जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ (कोतवडे, बुवा विजय मयेकर) होईल.
सायंकाळी ७.०० ते ९.०० या वेळेत ‘भक्तीसंध्या- भक्तीमय गीतांचा सुरेल नजराणा’ हा बहारदार सादर होणार आहे. यामध्ये ‘सूर नवा ध्यास नवा’फेम सुप्रसिद्ध गायिका संपदा माने, सुप्रसिद्ध गायक ओंकार प्रभुघाटे बहारदार गीते सादर करणार आहेत. कार्यक्रमात संवादिनीसाथ चैतन्य पटवर्धन, तबला निखिल रानडे, पखवाज मंगेश चव्हाण, तालवाद्य अद्वैत मोरे करतील व निवेदन कौस्तुभ सरदेसाई करणार आहेत.
रात्री ९.०० ते १०.०० या वेळेत श्री सिद्धिविनायक चक्री भजन मंडळ (रत्नागिरी, बुवा सचिन टिकेकर) सादर करतील. रात्री १०.०० ते १२.०० पर्यंत पारंपरिक श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ (घुडेवठार, बुवा सुदेश नागवेकर) सादर करतील. रात्री १२.०० वाजता आरती होऊन कालभैरव जयंती उत्सवाची सांगता होणार आहे.
या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन श्री भैरी, जोगेश्वरी, नवलाई-पावणाई, तृणबिंदूकेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र तथा मुन्नाशेठ सुर्वे आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे.


