(रत्नागिरी / वार्ताहर)
जलसंवर्धनातून भूजलपातळी वाढविणे, शेती आणि जनावरांसाठी पाण्याची उपलब्धता कायम ठेवणे तसेच संभाव्य पाणीटंचाईवर मात करणे, या उद्देशाने जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, अवघ्या १५ दिवसांत विविध गावांमध्ये ४ हजार ७१ वनराई बंधाऱ्यांची उभारणी पूर्ण करण्यात आली आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ४३८ बंधाऱ्यांचा समावेश आहे.
८ ते २२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत जगद्गुरु नरेंद्राचार्यजी यांच्या अनुयायांनी गावागावांत एकत्र येत ओढे, नाले, नदीपात्रे आणि अन्य जलप्रवाहांवर वनराई बंधारे बांधले. सामूहिक सहभागातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागात जलसंवर्धनाच्या कामाला गती मिळाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील तालुकानिहाय कामगिरीमध्ये खेड तालुक्याने १२६ बंधाऱ्यांसह प्रथम क्रमांक मिळविला आहे. गुहागर तालुक्यात ११२, चिपळूणमध्ये ६४, दापोलीमध्ये ३५, राजापूरमध्ये ३१, संगमेश्वरमध्ये २५, रत्नागिरीमध्ये २०, लांजा तालुक्यात १६, तर मंडणगडमध्ये ९ वनराई बंधारे पूर्ण करण्यात आले आहेत. अशा प्रकारे जिल्ह्यात एकूण ४३८ बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली आहे.
जलस्रोतांचे संवर्धन आणि पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी अनुयायांना ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेनुसार जलसंवर्धन कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत अनुयायांनी गावागावांत एकत्र येऊन श्रमदानाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला.
यंदा अनेक भागांत अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्याने आगामी काळात पाणीटंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे, स्थानिक जलसाठे निर्माण करणे आणि भूजलपातळी वाढविणे यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. वनराई बंधाऱ्यांमुळे ओढे, नाले आणि अन्य जलप्रवाहांमधील पाणी काही काळ अडवून ते जमिनीत मुरण्यास मदत होणार आहे. परिणामी शेतीसाठी, पिण्यासाठी तसेच जनावरांच्या पाण्याच्या गरजांसाठी या उपक्रमाचा लाभ होऊ शकतो.
जलप्रवाहांवर वनराई बंधारे उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात श्रम आणि सामूहिक सहभाग आवश्यक असतो. असे असतानाही नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने अनुयायांनी मोठ्या संख्येने एकत्र येत अवघ्या १५ दिवसांत राज्यभरात ४ हजार ७१ बंधारे उभारले. लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे जलसंवर्धनाच्या कार्याला व्यापक स्वरूप मिळाले आहे.


