(संगमेश्वर/ रत्नागिरी प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील बसथांबा उभारणीच्या कामाला स्थानिक पातळीवर विरोध होत असल्याने काम रखडले असून, हे काम सुरळीतपणे सुरू करण्यासाठी पोलिस संरक्षण मिळावे, अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग विभागाने केली आहे.
साखरपा उपविभागीय अभियंता कार्यालयाकडून संगमेश्वर पोलिस ठाण्याला पाठविलेल्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे, पनवेल–माहाड–पणजी राष्ट्रीय महामार्गावरील आरवली ते कांटे सेक्शन दरम्यान चौपदरीकरणाच्या अनुषंगाने तुरळ परिसरात बसथांबा उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, संबंधित ठिकाणी काही स्थानिक नागरिकांनी या कामास विरोध दर्शविल्याने प्रत्यक्ष काम सुरू करण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. विशेषतः काही व्यक्तींनी बसथांब्याच्या प्रस्तावित जागेबाबत आक्षेप नोंदवत अधिकाऱ्यांशी व कंत्राटदारांशी वाद घातल्याचे पत्रात म्हटले आहे. परिणामी, कामासाठी आवश्यक यंत्रसामग्री व मनुष्यबळ तैनात असूनही कामकाज सुरू होऊ शकलेले नाही.
दरम्यान, ग्रामपंचायत स्तरावर व स्थानिक नागरिकांशी चर्चा करून बसथांब्याची जागा निश्चित करण्यात आल्याचा दावा विभागाने केला आहे. ही जागा सार्वजनिक हिताची असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बसथांबा उभारणे अत्यावश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, विरोध कायम राहिल्यास प्रकल्पाच्या कामात विलंब होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, काम सुरू करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या या कामाकडे स्थानिकांसह प्रशासनाचे लक्ष लागले असून, पुढील काही दिवसांत यावर तोडगा निघतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

