(देवळे / प्रकाश चाळके)
लांजा आणि राजापूर तालुक्यांतील शेतीचा विकास, माती परीक्षणाला प्रोत्साहन आणि पारंपरिक फळबागांचे जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टीने राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत यांनी दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाला भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी आणि कृषी तज्ज्ञांशी विविध कृषीविषयक प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.
लांजा आणि राजापूर तालुक्यांना शेतीची समृद्ध परंपरा लाभली आहे. या भागातील भौगोलिक परिस्थिती, मातीचा पोत, हवामान आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा विचार करता कृषी उत्पादनवाढीसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. या क्षमतेचा प्रभावी वापर करण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती व मार्गदर्शन मिळावे, जमिनीची सुपीकता तपासण्यासाठी माती परीक्षणाचा वापर वाढावा आणि पारंपरिक फळबागांचे जतन व्हावे, यावर बैठकीत भर देण्यात आला.
आंबा, काजू यांसह अन्य फळपिकांच्या बागांचे योग्य व्यवस्थापन, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, जमिनीच्या आरोग्यानुसार पीक नियोजन आणि शेतीमालाची गुणवत्ता व उत्पादन वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच कृषी विद्यापीठातील संशोधन आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन प्रत्यक्ष ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.
माती परीक्षणामुळे जमिनीतील पोषक घटकांची अचूक माहिती शेतकऱ्यांना मिळू शकते. त्यानुसार खतांचा संतुलित वापर केल्यास उत्पादन खर्च कमी करण्याबरोबरच शेतीची उत्पादकता वाढविण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे स्थानिक पारंपरिक फळबागांचे जतन आणि संवर्धन केल्यास कोकणातील शेतीला नवसंजीवनी मिळू शकते, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
कोकण कृषी विद्यापीठातील संशोधन, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि तांत्रिक सहकार्याचा लाभ राजापूर व लांजा तालुक्यांतील शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी विद्यापीठ आणि स्थानिक शेतकरी यांच्यात अधिक प्रभावी समन्वय निर्माण करण्याबाबतही चर्चा झाली.
या दोन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविणे, स्थानिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आणि कोकणातील पारंपरिक फळबागांचे जतन करून कृषी क्षेत्राला नवी दिशा देणे, हा या भेटीमागील प्रमुख उद्देश होता.
यावेळी विद्यापीठ अभियंता श्री. राहुल घाडगे, शिक्षण संचालक डॉ. नारखेडे, वनशास्त्र महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अजय राणे, डॉ. एस. डी. देसाई, वाकवली येथील मध्यवर्ती संशोधन केंद्राचे संचालक डॉ. अरुण माने, गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर, उद्योजक सचिन शेठ पाकळे तसेच अन्य संबंधित उपस्थित होते.


