(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून परिसरातील शांतता व सार्वजनिक सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्यांविरोधात जिल्ह्यातील पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. रत्नागिरी ग्रामीण, खेड, राजापूर आणि चिपळूण पोलिस ठाण्यांच्या हद्दीत विविध घटनांमध्ये दारूबंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तिघांसह मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या एका चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन उभे करणाऱ्या व्यक्तीविरोधातही कारवाई करण्यात आली आहे.
रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पाली दूरक्षेत्राच्या हद्दीत साठरेबांबर फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या समीर दत्ताराम पेडणेकर (५३, रा. बांबर, पेडणेकरवाडी, रत्नागिरी) याच्याविरोधात कारवाई करण्यात आली. मद्यप्राशन करण्याचा परवाना नसतानाही तो रॉयल चॅलेंजर कंपनीची विदेशी दारू पिण्याच्या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी बसलेला आढळून आला. याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत भोस्ते पुलाजवळील स्मशानभूमीत मद्यप्राशन करणाऱ्या संदीप राम पवार (४०, रा. महात्मा फुलेनगर, खेड) याच्यावरही पोलिसांनी कारवाई केली. २६ ऑगस्ट रोजी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास तो मद्यप्राशन करताना आढळून आला. त्याच्याकडे मद्यप्राशनाचा कोणताही परवाना नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याच दिवशी सायंकाळी आनंद चित्रमंदिर, तीनबत्ती नाका, खेड परिसरात अजय पोपट पवार (२९, रा. संगलट, खेड) याच्यावरही सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजापूर तालुक्यातील पाचल बाजारपेठेत सफा हॉटेलसमोरील सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेस धोका व अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने रिक्षा उभी करणाऱ्या अनिल परशुराम चव्हाण (५०, रा. ताम्हाणे, शेंडेवाडी, राजापूर) याच्यावर पोलिसांनी कारवाई केली. त्याच्या ताब्यातील पियाजिओ कंपनीची ऍपे रिक्षा (एमएच ०८ ई ८२८७) रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या स्थितीत आढळली. याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम २८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, चिपळूण पोलिसांनी मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या तरुणाविरोधातही कारवाई केली. अजय संजय घाग (२४, रा. दहीवली, वाणेवाडी, चिपळूण) हा २६ ऑगस्ट रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास कापसाळ येथील कोकण किनारा ढाब्यासमोर मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत अल्टो कार (एमएच ०८ झेड ६३२१) चालविताना आढळून आला. याप्रकरणी मोटार वाहन कायदा कलम १८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

