(जळगाव / वृत्तसंस्था)
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात टाकरखेडा येथे एकाच कुटुंबातील पती-पत्नीसह दोन लहान मुलांनी रेल्वेरुळावर झोकून देऊन सामूहिक आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना आज (गुरुवारी) पहाटे उघडकीस आली. या घटनेने टाकरखेडा गावासह संपूर्ण अमळनेर तालुक्यात शोककळा पसरली आहे. धावत्या रेल्वेसमोर झोकून दिल्याने त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे होऊन चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
मृतांमध्ये सुनील अमृत भिल (वय २६), त्यांची पत्नी पार्वती सुनील भिल (वय २४), मुलगा सनी सुनील भिल (वय ६) आणि मुलगा राज सुनील भिल (वय ३) यांचा समावेश आहे. हे कुटुंब बुधवारी मध्यरात्री घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर गावाजवळील रेल्वे मार्ग परिसरात ही दुर्दैवी घटना घडल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. गुरुवारी सकाळी घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली.
सुनील भिल आणि पार्वती भिल हे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांचा मोठा मुलगा सनी इयत्ता दुसरीत, तर धाकटा मुलगा राज अंगणवाडीत शिक्षण घेत होता. कुटुंबातील चारही सदस्यांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. कुटुंबात आता सुनील यांच्या वृद्ध आई नवसारबाई या एकमेव हयात सदस्य राहिल्या आहेत.
घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय निकुंभ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे, हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील, विजय होईल, योगेश बागुल आणि राहुल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात पाठवले.
दरम्यान, मृत पार्वतीबाई यांच्या आई-वडिलांनी या प्रकरणाबाबत ऑनलाइन तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. कुटुंबाने हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणामुळे उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अमळनेर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

